अनाकलनीय...! - राज ठाकरे
लोकसभा निवडणुकीच्या निकालांना राज ठाकरे यांनी अनाकलनीय असे म्हटले आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. मतदानोत्तर चाचण्यांनी दिलेल्या कलापेक्षाही अधिक जागांवर भाजपप्रणित रालोआ आघाडीवर असून त्यांनी जवळपास १७५ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसह एकवटलेल्या विरोधकांची धूळधाण झाल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत 'अनाकलनीय' असा एकच शब्द लिहून निकालावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह या जोडगोळीच्या विरोधात महाराष्ट्रात धडाकेबाज प्रचार केला. त्यांनी राज्यात ठिक-ठिकाणी घेतलेल्या सभांमुळे निवडणूक प्रचारात वेगळे वातावरण निर्माण झाले होते. राज ठाकरे यांनी भाजपच्या अनेक योजना कशा फसल्या आहेत, याची पोलखोल व्हिडिओच्या माध्यमातून केली होती. त्यांचे हे प्रचारतंत्र यशस्वी ठरले होते. मात्र, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी अपयशी ठरली असून राज यांनी सभा घेतलेल्या ठिकाणीही काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले आहेत.
लोकसभेच्या निकालावर राज्याच्या विधानसभेचे गणित बऱ्यापैकी अवलंबून आहे. भाजपचा महाराष्ट्रातही मोठा विजय होत असल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांना रोखणे मनसेसह इतर सर्व विरोधकांपुढे मोठे आव्हान असणार आहे.