मुंबई - भाजप-शिवसेना दोघे सरकार चालवत आहेत. शिवसेनेचे मंत्री म्हणत होते. राजीनामे देऊ. शेवटपर्यंत दिलेच नाही. पक्षप्रमुख म्हणत होते आमची इतकी वर्षे सडली आणि आता ती १२४ वर अडली, अशी टीका गोरेगावच्या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. मला सक्षम विरोधी पक्ष व्हायच आहे. इतिहासात असा कोणताही पक्ष नाही, ज्याने विरोधी पक्षाची मागणी केली, असेही यावेळी राज म्हणाले. आज (गुरूवार) मुंबईतील गोरेगाव येथे राज ठाकरे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी सेना-भाजपचा खरपूस समाचार घेतला.
'प्रबळ विरोधी पक्ष व्हायच आहे'
विधानसभेसाठी माझी भूमिका आहे. कोणासमोरही घरंगळत न जाणाऱ्या सक्षम विरोधी पक्षाची राज्याला गरज आहे. कारण सध्या प्रश्न विचारणाराच कोणी नाही. तुमच्यावर अन्याय होत असेल तर त्याची विचारणा करण्यासाठी कोणी तरी हवे. माझ्या आवाक्याप्रमाणे तुमच्यासमोर म्हणणे मांडलंय. काँग्रेसचा विरोधी पक्षनेताच भाजपात जात गेला. असे म्हणत त्यांनी शिवसेनेतील इन्कमिंगवरही टीका केली. ते म्हणाले, बाळासाहेब असताना माणसे आयात करण्याची कधीच गरज पडली नव्हती. जाणाऱ्याच्या कार्यकर्त्यांनाही कळत नसेल की आपले साहेब कोणत्या पक्षात जाणार?
माझं थोबाड थांबणार नाही, इडीच्या नोटिशीवर राज ठाकरेंचा हल्लाबोल
ईडीकडून मला नोटीस पाठविण्यात आली. माझी चौकशी करण्यात आली पण, जे धमक्यांना घाबरले ते भाजपात गेले. मला फरक पडत नाही, माझ तोंड थांबणार नाही, असा हल्ला भाजपवर राज ठाकरे यांनी चढवला.
'आरे'संबंधी न्यायालयाचे सरकारशी संगनमत
आरेसंबंधी न्यायालयाचे सरकारशी संगनमत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. शनिवारी-रविवारी जवळपास 2 हजार 700 झाडांची कत्तल करण्यात आली. हे का झालं, कारण विरोध करायला कोणी नाही. आधीच्या सरकारमध्ये पर्यावरणमंत्री शिवसेनेचे रामदास कदम होते. ते ही वृक्षतोड का थांबवू शकले नाहीत ? आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, आमचे सरकार आल्यावर आम्ही आरेला जंगल घोषित करू. पण, जंगल घोषित करायला झाडे राहीलीच कुठे?, असा सवाल त्यांनी केला. प्रगतीला माझा विरोध नाही. आरेची जमीन कशाला हवी. कुलाब्याची जमीन कोणाच्या घशात घालायची आहे, असा सवाल केला होता. मेट्रोचे कारशेड तिथे करायला हवे होते. त्यासाठी आरेची जमीन घेण्याची काय गरज होती, कोण्या उद्योगपतीने सांगितले होतं का, अशी टीका त्यांनी केली.