महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वतःच्याच गावाचा विकास न करू शकणारा, देशाचा विकास कसा करणार; राज ठाकरेंचा सवाल

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी किती खोटे बोलतात याचा पुरावा म्हणून त्यांच्या वडनगर गावाचा व्हिडीओ दाखवला.

By

Published : Apr 25, 2019, 6:04 PM IST

राज ठाकरे

मुंबई- जो व्यक्ती आपल्या गावाचा विकास करू शकत नाही, तो आपल्या देशाचा विकास कसा करू शकतो ? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. भांडूप येथे आपल्या आठव्या सभेदरम्यान ते बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारचे व्हिडिओ दाखवून राज ठाकरे यांनी आपल्या ठाकरी शैलीत मोदी यांचा समाचार घेतला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि शाह मुक्त भारत निर्माण करण्यासाठी राज ठाकरे महाराष्ट्रभर दहा सभा घेणार आहेत. त्यापैकी आठवी सभा भांडुप पश्चिम येथे पार पडली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी किती खोटे बोलतात याचा पुरावा म्हणून त्यांच्या वडनगर गावाचा व्हिडीओ दाखवला. या गावात शौचालय नाही. लोक उघड्यावर शौच करतात. या गावात सर्वाना घरे देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. पण अद्याप गावातील कोणालाही घरं देण्यात आलेली नाहीत. यावरून जो स्वतःच्या गावाचा विकास करू शकत नाही, तो माणूस देशाचा काय विकास कारणार? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

सरकारच्या योजनांच्या जाहिरातींवर साडेचार हजार कोटी खर्च केले, यावरही राज यांनी तोंडसुख घेतले. कोट्यवधींच्या जाहिराती दाखवल्या तरीही लोकांना नोकऱ्या देता आलेल्या नाहीत. एकही नवा उद्योग उभा करता आला नाही आणि निव्वळ जाहिरातींवर खर्च करून लोकांना फसवायचा प्रयत्न करायचा, हा उद्योग भाजपने केला. भाजपचे नेते विरोधी पक्षात असताना गॅस दरवाढ आणि महागाईविरोधात ओरडायचे आता गॅस दरवाढ आणि महागाई झाली तरी गप्प बसले आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

हरिसालमधील डिजीटल इंडिया, कॅशलेस गावातील स्थिती, रिबी हटाव योजनेंचा पर्दाफाश केल्यानंतर नरेंद्र मोदींनी सांसद ग्राम योजनेच्या अंतर्गत दत्तक घेतलेल्या उत्तर प्रदेशमधील नागेपूर गावचा व्हिडिओ यावेळी राज ठाकरेंनी दाखवला. या गावात मूलभूत सोयी-सुविधादेखील आल्या नसल्याचा व्हिडिओ दाखवून राज ठाकरेंनी पोलखोल केली. ‘मी इतके दिवस सांगितल्यानंतर आता म्हणतायत आम्ही उत्तर देणार. हरिसाल गावातल्या स्थानिक लोकांनीच सांगितले की, मोदींनी सांगितलेल्या योजना फेल ठरल्या आहेत. नमामी गंगा प्रकल्पही फोल ठरला. खरंतर हा प्रकल्प राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी जाहीर केला होता. पण त्याचेही श्रेय मोदींनी घेतले. तरीही गंगा अजूनही स्वच्छ करता आलेली नाही’, असे सांगत ठाकरे यांनी मोदींचा समाचार घेतला.

फकीर नव्हे बेफिकीर पंतप्रधान -

पुलवामा हल्ल्यामध्ये आपल्या देशाचे ४० जवान धारातीर्थी पडेल. या घटनेमुळे संपूर्ण देश दुःखात होता. याच वेळी आपले पंतप्रधान नवनवे कपडे घालून हसत फिरत होते, असे फोटो राज ठाकरे यांनी उपस्थितांना दाखवले. संपूर्ण देश दुःखात असताना आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या तोंडावर दुःख दिसत नव्हते. यावरून हा पंतप्रधान फकीर नव्हे, तर बेफिकीर असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला.

खोट बोलण्याचा रोग अख्ख्या पक्षाला झालाय -

राज्यात ठिकठिकाणी खोदलेल्या रस्त्यांच्या स्थितीवर राज यांनी पुन्हा सरकारला लक्ष्य केले. येथे रस्ते खणून ठेवलेत आणि पुन्हा म्हणता ‘राज साहेब आगे बढो’, कुठून पुढे जाऊ? अशी खिल्ली उडवली. यानंतर एकच हशा पिकला. भाजपवाले माझ्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत. पण खोट बोलण्याचा रोग अख्ख्या पक्षाला झाला आहे. मात्र, मोदी मुमकीन हैं जाहिरातीतील कुटुंबाला स्टेजवर आणून त्यांची ओळख करून दिल्याचे सांगत राज यांनी भाजपचा खोटेपणा उघड केला.

प्रज्ञा सिंहला उमेदवारी का दिली? -

‘साध्वी, प्रज्ञा सिंह मालेगांव बॉम्बस्फोटप्रकरणी तुरुंगात होत्या. जामिनावर बाहेर आल्यावर त्यांनी हेमंत करकरे हे माझ्या शापाने मेल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी समर्थन केले आहे. या लोकांना आमच्या पोलिसांबद्दल काहीच कसे वाटत नाही, असा प्रश्न उपस्थित करत दहशतवाद हा दहशतवाद असतो, त्याला कोणताही धर्म नसतो, असे राज ठाकरे म्हणाले. प्रज्ञा सिंहवर सिग्नल तोडल्याची केस नसून बॉम्बस्फोटाची केस आहे. जवानांचा अवमान करणाऱ्या प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी का दिली, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

‘भाजपवाले काँग्रेसपेक्षाही नालायक’ -

किरीट सोमय्या मोनिका मोरेच्या अपघातानंतर रेल्वे स्टेशनवरचे प्लॅटफॉर्म मोजत होता. पण तेव्हापासून आत्तापर्यंत त्यावर काहीही बोलला नाही. २०१४ मध्ये मोनिका मोरेचे अपघातात हात गेले. काँग्रेस सरकारने मदतीचे आश्वासन दिले होते. पण मदत केली नाही. तेव्हा सोमय्या यांनी काँग्रेसच्या नावाचे भांडवल केले होते. पण २०१४ ते २०१७ या काळात मुंबईच्या रेल्वे अपघातात १८ हजार ४२३ मृत्यू झाले आहेत, अशा लोकांना काम मिळत नाही, त्यांना यांचे सरकार रोजगार देऊ शकले नाही, याविरोधात सोमय्या गप्प का, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. किरीट सोमय्या यांनी सुरुवातीला ईव्हीएम मशीनमध्ये घोळ आहे, असे सांगितले होते, २०१४ मध्ये भाजपचे सरकार आले त्यानंतर आतापर्यंत सोमय्या ईव्हीएम मशीनवर कधीही बोलले नाहीत. काँग्रेसवाल्यांपेक्षा भाजपवाले नालायक असल्याची टीका यावेळी राज ठाकरे यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details