ठाणे : Raj Thackeray Appeal :सध्याचं राजकीय वातावरण अत्यंत गढूळ झालं असून, कुठं काय घडेल याचा नेम नाही. मात्र, लेखक व कवींना परमेश्वरानं जी शब्दांची देणगी दिली आहे, त्याचा वापर करणं गरजेचं आहे. मराठी साहित्यिकांनी वर्तमान राजकीय परिस्थितीवर परखडपणे भाष्य करावं, असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात केलंय.
मंत्र्यांना वर्तमानाचं भान नाही : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांचं असंग्रहीत साहित्य असलेल्या दोन पुस्तकांचं प्रकाशन ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे पार पडलं. या सोहळ्यात बोलताना राज ठाकरेंनी महाराष्ट्र व देशातील राजकीय परिस्थिती तसंच मराठी भाषा व साहित्य यावर भाष्य केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष असलो तरी स्वतःला राजकारणी म्हणून घेत नाही. पण सध्या जो राजकीय खेळखंडोबा सुरू आहे, त्यावर साहित्यिकांनी पुढं येऊन बोलणं अत्यंत आवश्यक आहे. कुसुमाग्रजांची कविता कठोरपणे भाष्य करणारी असून, ती राजकारण्यांना समजत नसेल तर सर्वसामान्य लोकांना तरी कळलीच पाहिजे. मात्र, मंत्र्यांना वर्तमानाचं भान नाही. यावेळी चित्रपट दिग्दर्शक अभिजित पानसे, कवी अशोक बागवे, अरुण म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.