मुंबई Raj Thackeray: आगामी लोकसभा, विधानसभेच्या निवडणूका तोंडावर आहेत. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. अशात महाराष्ट्रातील मनसे आणि शिवसेना या दोन राजकीय पक्षांचं लक्ष असतं ते त्यांचा कोअर मतदार असलेल्या सिनेट निवडणुकांवर. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे दोन्ही नेते याच विद्यार्थी दशेतील राजकारणातून पुढे आले. त्यामुळं या दोन्ही नेत्यांचं सिनेट निवडणुकीवर विशेष लक्ष असतं. या निवडणुकीच्या दृष्टीने पदवीधर मतदार नोंदणी दोनही पक्षांकडून केली जात आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांनी पदवीधर मतदारांच्या फार कमी नोंदण्या केल्याने, आज बोलावलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
'झेपत नसेल तर राजीनामे द्या'...: काही महिन्यांपूर्वी सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सर्व शाखाप्रमुख, विभाग प्रमुख यांना मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदारांच्या नोंदणी करून घेण्याचे आदेश दिले होते. जास्तीत जास्त अर्ज भरून घ्या असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. आता निवडणुका तोंडावर असताना, एकूण किती नोंदणी झाल्या? याचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे यांनी या सर्व शाखाप्रमुख, विभाग प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत फार कमी पदवीधर मतदारांनी नोंदण्या केल्याचं समोर आलं. त्यामुळं राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. 'झेपत नसेल तर राजीनामे द्या.' अशा शब्दात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना झापलं आहे.