मुंबई :लोकसभा, विधानसभेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजताच, राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. विविध पक्षांकडून मतदारसंघातील चाचपणी सोबतच मोट बांधणीला देखील सुरुवात झाली आहे. महत्वाच्या नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आल्या आहेत. राज्यात सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून आपल्या नेत्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून असे पोस्टर लावले जात आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, काँग्रेसचे नेते नाना पटोले, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांचेही नागपूरात असेच पोस्टर झळकले होते. उलटसुलट चर्चा यावेळी रंगल्या होत्या.
वाढदिवसानिमित्त ठीकठिकाणी बॅनरबाजी :आता बॅनरबाजीच्या शर्यतीत मनसे आणि युवासेनाही उतरली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा उल्लेख ही भावी मुख्यमंत्री म्हणून करण्यात आला आहे. दादर शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. भविष्यात महाराष्ट्राच्या सत्तेची सूत्रे स्वतःच्या हातात ठेवणारा सत्तेचा रिमोट कंट्रोल, असा उल्लेख या पोस्टरवर करण्यात आला आहे. तर आदित्य ठाकरे यांचे वरळी, नाशिक, कोल्हापूर आदी भागात बॅनर लावले आहेत. दोघांच्या ही वाढदिवसानिमित्त ठीकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. राजकीय विरोधक असलेल्या काका-पुतण्याचा उल्लेख कार्यकर्त्यांकडून भावी मुख्यमंत्री केल्यानंतर राजकीय गोटात आता चर्चेला उधाण आले आहे.