मुंबई - सध्या मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासूनच मुंबईसह आसपासच्या परिसरात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. दक्षिण कोकणात आज (रविवार) जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या 14 व 15 जुलै रोजी, मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी सांगितले.
हवामानाचा अंदाज
१२ जुलै - कोकणासह गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
१३ जुलै - कोकणसह गोव्यात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता..
१४-१५ जुलै - गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
इशारा
१३ जुलै - कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
१४ जुलै - कोकणासह गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
१५ जुलै - कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
आज सकाळपर्यंत मुंबईचे तापमान सांताक्रुझ वेधशाळेने कमाल 29 तर किमान 25 असे नोंदवले होते. मागील 24 तासात सांताक्रुझ वेधशाळेने 21.9 मिमी पावसाची नोंद केली आहे. तर कुलाबा वेधशाळेने 13 मिमी पावसाची नोंद केली आहे.