मुंबई - येथे गुरूवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. उपनगरात पावसाचा जोर जास्त होता. तसेच पवई तलावात एकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत गुरूवारी सकाळी 8 ते सायंकाळी 6 या कालावधीत वेधशाळेच्या कुलाबा येथे 26.2 मिलिमीटर तर सांताक्रूझ येथे 36.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मुंबई महापालिकेच्या पावसाची नोंद करणाऱ्या केंद्रांवर करण्यात आलेल्या नोंदीनुसार शहरात 37.43, पश्चिम उपनगरात 34.04 तर पूर्व उपनगरात 52.06 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहरात दादर, धारावी पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, गोवंडी, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड तर पश्चिम उपनगरात कांदिवली, मालवणी आणि वांद्रे या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
पावसादरम्यान शहरात 5, पूर्व उपनगरात 5 तर पश्चिम उपनगरात 8 अशा 18 ठिकाणी झाडे आणि फांद्या पडल्या. तसेच शहरात 1, पूर्व उपनगरात 3 तर पश्चिम उपनगरात 1 अशा 5 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटनांची नोंद झाली.