मुंबई -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीमुळे रेल्वे बंद झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर बहुतांश रेल्वे वेगळ्या रेल्वे क्रमांकाने सुरू झाल्या. एक्सप्रेस रेल्वेला सुरफास्ट म्हणून सुरफास्ट रेल्वेचे तिकीट दर प्रवाशांकडून आकारण्यात येत आहे. अशा प्रकारे प्रवाशांची फसवणूक केली जात असल्याची चर्चा सुरू आहे.
14 रेल्वे गाड्या सुपरफास्ट नाही
गेणेशोत्सवाला काही महिन्यांवर येऊ ठेपला आहे. मानाचा गणपती गावी बसविण्यासाठी मुंबईतून चाकरमान्यांनी मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्यांनी गावाकडे जातात. यातच नागरिकांची गैरसोय होऊ नयेत, म्हणून कोकण मार्गावर अनेक विशेष गाड्या चालविण्यात येतात. विशेष म्हणजे कोकणातील जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस लोकप्रिय गाडी आहे. मात्र, जनशताब्दी एक्स्प्रेस सुपरफास्ट नसतानाही प्रवाशांकडून सुपरफास्टचा शुल्क आकारत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय कोकण मार्गाने धावणाऱ्या 14 रेल्वे गाड्याही रेल्वेचा सुपरफास्ट नियमात बसत नाही. तरीही प्रवाशांकडून सुपरफास्ट शुल्क आकारण्यात येत आहे.
रेल्वेच्या नियमाला हरताळ
कोरोना महामारीच्या संकटात संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून बंद झालेल्या बहुतांश रेल्वे आता सुरू झाल्या आहेत. मात्र, नियमित गाड्याऐवजी मेल-एक्स्प्रेसच्या नंबरमध्ये बदल करून विशेष तिकीट दराने या गाड्या आज देशभरात धावत आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे लॉकडाऊनमुळे आगोदरच कंबरडे मोडले आहे. यात प्रत्येक बाबींचे दर प्रचंड वाढल्याने नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. सामान्य नागरिकांना परवडणारे रेल्वेचे तिकीटही विशेष गाड्याचा नावावर वाढविण्यात आले आहे. कोकण मार्गवर धावणारी मध्य रेल्वेची जनशताब्दी एक्स्प्रेस सुपरफास्ट नसतानाही प्रवाशांकडून सुपरफास्टचा शुल्क आकारत आहेत. रेल्वेच्या नियमानुसार कोणतीही गाडी सुपरफास्ट होण्यासाठी तिच्या दोन्ही दिशांचा सरासरी वेग किमान 55 किलोमिटर प्रतितास इतका असणे आवश्यक असते. रेल्वेच्या नियमाला हरताळ फासून प्रवाशांकडून सुपरफास्ट शुल्क आकारण्यात येत आहेत.
असा घेत आहे सुपरफास्ट शुल्क
मध्य रेल्वेची 01151/01152 जनशताब्दी एक्स्प्रेस या गाडीचा सरासरी वेग फक्त 52.6 किलोमिटर प्रतितास आहे. तरीही प्रवाशांकडून सुपरफास्ट शुल्क आकरण्यात येत होता. रेल्वे नियमानुसार ज्या रेल्वे गाडीचा वेग 55 किमी प्रतितास इतका असतो. त्या गाडीच्या एक्झिक्युटिव्ह एसी-1 कोच 75 रुपये, एससी-2 कोच 45 रुपये, एसी-3 45 रुपये, प्रथम श्रेणी 45 रुपये, स्लिपर कोच 30 रुपये आणि व्दितीय श्रेणी 15 रुपये असा सुपरफास्ट शुल्क आकारण्यात येतो.
गाड्यांवर सुपरफास्ट अधिभार बंद करा
कोकण रेल्वे मार्गावर अनेक गाड्या नियमित वेळापत्रकात सुपरफास्ट असल्या तरी कोकण रेल्वेवर 10 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत मान्सून वेळापत्रक लागू केले जाते. ज्यात गाड्यांचा वेग कमी केला जातो. त्यामुळे अनेक सुपरफास्ट गाड्यांचा वेग 50-52 किलोमिटरपर्यंत खाली येतो. म्हणजेच वर्षाच्या 365 पैकी 144 दिवस (39 टक्के) या गाड्या सुपरफास्ट नसतात. साडेचार महिने हा फार मोठे काळ आहे. त्यामुळे रेल्वेने प्रतितास 55 किलोमीटर वेगाने न चालणाऱ्या गाड्यांवर सुपरफास्ट अधिभार लावू नयेत, अशी माहिती रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
रेल्वे काय म्हणते
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, याबाबातची माहिती संबंधित विभागाकडे कारवाईसाठी पाठविण्यात आली आहे. तर कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या नियमित वेळापत्रकात सुपरफास्ट असल्या तरी कोकण रेल्वेवर मान्सून वेळापत्रक लागू आहे. त्यामुळे रेल्वे गाड्याची गती कमी केली आहे.
कोकणी रेल्वे प्रवाशांला तिहेरी भुर्दंड
कोकण रेल्वे मार्गावर आगोदरच रेल्वे प्रवासी वाहतुकीसाठी 40 टक्के अधिभार घेतला जात आहे. हा अधिभार 1995 पासून घेण्यात येत आहे. तसेच गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे सर्व नियमित गाड्या वेगळ्या क्रमांकाने विशेष गाड्या या नावाखाली 30 टक्के वाढीव भाड्यावर सुरू आहेत. त्यातच आता 14 रेल्वे गाड्या सुपरफास्ट नसतानाही रेल्वे सुपरफास्ट शुल्क प्रवाशांकडून वसूल केली जात आहे. त्यामुळे कोकणी रेल्वे प्रवाशांला तिहेरी भुर्दंड सहन करावा लागत आहे.
हेही वाचा -ज्येष्ठ नागरिकाची फेसबुकवर मैत्रीकरून ऑनलाइन साडे तीन लाखांना गंडा घालणाऱ्या तिघांना अटक