मुंबई - आज पहाटेपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबई शहराला पहिलाच पावसाने पुरते झोडपुन काढले. या पावसामुळे मध्य रेल्वे वाहतुकीचे तीन-तेरा वाजले आहे. सायन ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या जागीच खोळंबल्या आहे. तसेच खबरदारी म्हणून मध्य रेल्वेने सीएसएमटी ते कुर्ला दरम्यानच्या सर्व लोकल सेवा बंद केली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी लोकल गाड्यात अडकून पडले आहेत.
सीएसएमटी ते कुर्ला लोकल सेवा बंद -
महाराष्ट्रासह मुंबई आणि इतर भागात मंगळवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मुंबईत रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आज मान्सूनचे मुंबईत आगमन झाले आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसलेला आहे. सकाळीपासून ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गवरील सकाळी 9 वाजेपर्यत वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मात्र, सायन ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या जागीच खोळंबल्या आहे. खबरदारी म्हणून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 9 वाजून 50 मिनिटांनी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान लोकल सेवा बंद केली आहे. तसेच हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी दरम्याचा लोकल सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत.
हेही वाचा -मान्सून मुंबईत दाखल; रात्रीपासून बरसतोय जोरदार पाऊस