मुंबई - बेकायदेशीर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रेल्वे ई-तिकीटची विक्री करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) पर्दाफाश केला. तत्काळ तिकीट आरक्षणाच्या ई-तिकीटमध्ये या सॉफ्टवेअरचा वापर करून ती जास्त किंमतीला विकली जात होती. यातील पैशांची देवाणघेवाण ही दहशतवादी संघटना आणि मनी लाँड्रींगसाठी होत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून ही पैशांची देवाण-घेवाण करण्यात येत होती. यांचा मुख्य अड्डा हा सुरत शहरात असून याचे धागेदोरे थेट दुबईपर्यंत आहेत. आत्तापर्यंत या घोटाळ्यात देशभरातून 79 जणांना अटक करण्यात आली आहे. अकरम अब्दुल कलाम आणि सत्यवान उपाध्याय हे यातील मुख्य आरोपी आहेत. आतिक शेख याला कुर्ला येथून, नुरुल हसन याला गोवंडी, इरफान कागझी आणि रिझवान कागजी यांना सुरत येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील एक आरोपी हमीद अश्रफ हा फरार आहे. तो नेपाळमार्गे दुबईला पळाला आहे. इतर दोन आरोपी हमीद आणि राजू पोतदार या दोघांचा जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंध आहे. अमित प्रजापती, अमीन गुलाम हुसेन कागझी हे या सॉफ्टवेअरचे मास्टरमाईंड आहेत, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी दिली.