मुंबई- मुंबईची लाइफलाइन मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेत प्रवाशांचा मोबाईल फोन, अंगावरील दागिने, लॅपटॉप व पाकिट हे दरदिवशी चोरीला जातात. यावर रेल्वे पोलिसांकडून कारवाई करत 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. मात्र, कोरोना संक्रमणामुळे नागरिकांना घरा बाहेर पडता येत नसल्यामुळे स्वतः रेल्वे पोलिसांनी टाळेबंदीच्या काळात संबंधित पीडित रेल्वे प्रवाशांना त्यांचा मुद्देमाल स्वतः त्यांच्या घरी जाऊन परत केला आहे. जून 2020 ते सप्टेंबर 2020 या काळात रेल्वे पोलिसांकडून 14 हजार 566 प्रकरणातील तब्ब्ल 2 कोटी 13 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल पीडित प्रवाशांना परत केला आहे.
बांद्रा रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तक्रारदार क्लाइव्ह डिसोजा यांची 26 वर्षांपूर्वी 5 ग्राम सोन्याची साखळी परत मिळवून देण्यात आली आहे. तर, बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 वर्षांपूर्वी तक्रारदार रमेश पटेल यांची 2 हजार 20 नग कच्चे हिरे चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी 19 वर्षानंतर पुन्हा ते मिळवून दिले आहेत.
सप्टेंबर 2019 मधील कारवाई
रेल्वे पोलिसांकडून सप्टेंबर 2019दरम्यान 81 लाख 60 हजारांचा चोरी करण्यात आलेला मुद्देमाल प्रवाशांना परत करण्यात आलेला असून यात 1 किलो 180 ग्रॅम सोन्याचे दागिने व 6 लॅपटॉप परत करण्यात आले आहेत. रेल्वे पोलिसांनी या काळात तब्बल 46 लाख 57 हजारांची रोख रक्कम पीडित प्रवाशांना पुन्हा मिळवून दिली आहे.