मुंबई :मुंबईमध्ये मध्य, हार्बर आणि पश्चिम या मार्गावर रेल्वे चालवली जाते. मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा कर्जत खोपोली या मार्गावर, हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल गोरेगाव या मार्गावर तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरार डहाणू पर्यंत रेल्वे चालवली जाते. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असल्याने तसेच कोणीही नोकरीनिमित्त मुंबईत येते. दोन वेळच्या जेवणाची सोय सहज करू शकत असल्याने मुंबईमधील लोकसंख्या सतत वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवास परवडत असल्याने ७० लाखाहून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात.
एमयुटीपी प्रकल्प रखडले :रेल्वेने लाखो जण प्रवास करतात. यामुळे ट्रेनला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अनेकांना ट्रेनच्या दरवाजात लटकत प्रवास करावा लागतो. यामुळे दरवर्षाला अडीच हजार प्रवाशांचा मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासाठी तसेच प्रवाशांना प्रवासामध्ये चांगल्या सुविधा देण्यासाठी एमयुटीपी प्रकल्प २ आणि ३ सुरु करण्यात आले आहेत. मात्र यासाठी गेल्या दोन ते अडीच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारकडून योग्य प्रमाणात फंड देण्यात आलेला नाही. गेल्या काही वर्षात फंड योग्य प्रमाणात दिला जात नसल्याने हे प्रकल्प आजही पूर्ण झालेले नाहीत अशी माहिती रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी दिली.