मुंबई -कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना प्रवाशांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. मात्र लस न घेणाऱ्या लोकांच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील सर्व प्रवाशांसाठी लोकल प्रवास सुरु करावी, ही मागणी घेऊन आज (मंगळवारी) मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकांवर विविध सामाजिक संघटनांकडून राज्य सरकारविरोधात रेल रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अनेक नागरिक सहभागी झाले होते. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
'बेकायदेशीर आदेश तत्काळ रद्द करा'
रेल्वे ही देशाची धमणी असल्याने रेल्वे प्रवासासाठी घालण्यात आलेल्या तुघलकी व जाचक अटींना रद्द करून रेल्वे प्रवास सर्वांसाठी खुला करण्यात याव, यासाठी आगरी युवक संघटना, सोशल हेल्थ मूवमेंट व स्वदेशी भारत आंदोलन यांच्यामार्फत दिवा स्टेशन येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व मुंबईकरांनी तसेच सर्व रेल्वे प्रवासी संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला होता. यावेळी 'अवेकन इंडिया मुव्हमेंट'चे फिरोज मिठीबोरवाला यांनी सांगितले, की राज्य सरकारने १५ ऑगस्ट २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना प्रवाशांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. मात्र लस न घेणाऱ्या लोकांच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने बेकायदेशीर काढलेले आदेश तत्काळ रद्द करावेत. मास्क वापरण्याची व लसीकरणाची सक्ती आणि जबरदस्ती करू नयेत, कारण जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केल्याप्रमाणे ती स्वच्छिक आहे. केंद्र व राज्य सरकारने कोरोनाचे नाटक बंद करून, संपूर्ण टाळेबंदी संचारबंदी व सर्व प्रकारचे निर्बंध त्वरीत हटवून सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरु करण्याची परवानगी द्यावीत, अशी मागणी सुद्धा फिरोज मिठीबोरवाला यांनी केली आहे.
'आता प्रत्येक स्थानकांवर होणार आंदोलन'
आज मोठ्या प्रमाणात नागरिक कर्जत, कसारा, खोपोली, डहाणू, रोहा या परिसरातून मुंबईत कामाला येतात. मात्र, गेल्या काही महिन्यापासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलचे दार बंद असल्याने त्यांना कामाला जाण्यासाठी खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड बसत आहे. अनेकदा प्रवासी संघटना आणि सामाजिक संघटनांनी राज्य सरकारला सर्वांसाठी लोकल सेवा सुरु करण्याची मागणी केली होती. मात्र, शासनाने प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आज आम्ही दिवा रेल्वे स्थानकांवर रेल रोको आंदोलन केले. जर आता सुद्धा शासनाकडून आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर येणाऱ्या दिवसात प्रत्येक स्थानकांवर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आलेला आहे.
हेही वाचा -भाजपाची जन आशीर्वाद यात्रा पेट्रोल, डिझेलचे भाव दुप्पट करायला आहे का? नाना पटोलेंचा सवाल