मुंबई :3 मे ला कंदरपाडा, दहिसर (पश्चिम) आणि 4 मेला शिवदास वापसी मार्ग, माझगाव आणि चिता कॅम्प, ट्रॉम्बे येथे मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ कक्षाच्या पथकाने छापेमारी केली. यावेळी एकूण 123 ग्राम 'एम.डी.' हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. याची किंमत अंदाजे २५ लाख रुपये इतकी आहे. तसेच एकूण ३०१ ई-सिगारेट आणि ई-सिगारेट रिफीलिंग करण्याचे साहित्य देखील जप्त केले गेले. त्याची किंमत अंदाजे ५ लाख रुपये आहे.
कांदिवली युनिटची कारवाई : मागील १२ तासांमध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे कांदिवली युनिट, वरळी युनिट व आझाद मैदान युनिटने विशेष मोहिमे अंतर्गत ही कारवाई केली आहे. कांदिवली युनिटने 3 मे रोजी कंदरपाडा परिसरातून १२३ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त केले. यानंतर दहिसर (पश्चिम) या ठिकाणी दोन इसमांच्या अंगझडतीत एकूण ७७ ग्रॅम 'एम.डी' जप्त केला आहे. ज्याची किंमत अंदाजे १५ ते ४० लाख रुपये इतकी आहे. कांदिवली युनिटकडून दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले गेले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
वरळी युनिटची कारवाई: त्याचप्रमाणे वरळी युनिटने 4 मे रोजी शिवदास चापशी मार्ग, माझगाव या ठिकाणी एका 23 वर्षीय इसमाच्या ताब्यातून ४६ ग्रॅम 'एम.डी.' (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त केला आहे. याची अंदाजे किंमत 9 लाख 20 हजार इतकी आहे. या प्रकरणी वरळी युनिटकडून आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
आझाद मैदान युनिटची कारवाई: अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटने 4 मे ला के.जी. एन. कलेक्शन, चिताकॅम्प, ट्रॉम्बे याठिकाणी मोठी कारवाई केली. येथे ई-सिगारेटच्या विक्री बरोबरच, वापरलेल्या ई-सिगारेट पुन्हा विक्री करण्यासाठी रिफील केल्या जात होत्या. यासह त्यांच्या बॅटरीज पुन्हा रिअसेंबल केल्या जातात अशी माहिती पथकाला प्राप्त झाली. त्याआधारे ट्रॉम्बे येथील ठिकाणी छापा टाकून एका इसमास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या कडून अंदाजे 5 लाख किंमतीचा अंमली पदार्थांचा साठा आणि इतर साहित्य जप्त केले गेले. त्याबाबत आझाद मैदान युनिटतर्फे आरोपी विरुद्ध कलम ७ व ८ इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा २०१९ अन्वये गुन्हा नोंदविला गेला.
3 आरोपींना अटक: अशा प्रकारे अंमली पदार्थ विरोधी कक्षाने मागील १२ तासांमध्ये मुंबई शहरामध्ये विविध ठिकाणांवर छापेमारी करत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. यात एकूण ३ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हेही नोंदविले गेले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे ३० लाख रुपये आहे.
२.६ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त: एकंदरीत, मागील १५ दिवसात विशेष मोहिमेदरम्यान अंमली पदार्थ विरोधी कक्षाने एकूण १४ गुन्हे नोंदविले. त्यामध्ये एकूण २१ आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून एम.डी. ८४९ ग्रॅम, चरस १ किलो २३० ग्रॅम, हेरॉईन ९२.४ ग्रॅम, हायड्रोपोनिक गांजा २८० ग्रॅम असा सुमारे २.६ कोटीपेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा:तुमच्या भावनांचा आदर करून एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार, पवारांचा कार्यकर्त्यांना शब्द