मुंबई - शिवसेनेचे ( शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे यांच्याबाबत कथित बदनामीकारक मजकूर माध्यमामधून प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर 100 कोटी रुपयांचा मानहानी खटला दाखल केला होता. त्याबाबत आज माजगाव न्यायालयात सुनावणी झाली असता उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत यांनी दोष मुक्ततेसाठी अर्ज केला. या खटल्यातून त्यांचं नाव वगळावं असे त्यात नमूद केले. न्यायाधीश एस. बी. काळे यांच्या न्यायालयात हा दोष मुक्तीचा अर्ज दाखल केला. हा अर्ज आज दाखल करण्यात आला.
(पी आर बी )वृत्तपत्र अधिनियम 1867 नुसार वर्तमानपत्राने जो घोषित संपादक नमूद केलेला आहे, तोच पीआरबी अधिनियमानुसार जबाबदार असतो. त्यामुळे त्याच्याशिवाय इतर कोणीही त्यासंदर्भात जबाबदार नसतात. परिणामी खासदार संजय राऊत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नावं त्यातून वगळली जावीत, असेदेखील अर्जामध्ये वकिलांनी नमूद केलेले आहे. वकिलांनीहादेखील मुद्दा सुनावणीच्या दरम्यान मांडला. आपल्यावरील आरोप पूर्णपणे अस्पष्ट आणि चुकीचे आहेत, असा त्यांनी अर्जात दावा केला आहे.
पुढील सुनावणी 16 ऑक्टोबरला होणार-वर्तमानपत्राच्यावतीने सहाय्यक संपादक अतुल जोशी हे कोणत्याही बातमींच्या संदर्भात जबाबदार आहेत आणि राहतील. कायदेशीर जबाबदारी त्यांच्यावरच आहे. त्यामुळेदेखील तर्कसंगत रीतीने त्यांच्याशिवाय इतर कोणालाही यासंदर्भात जबाबदार धरणे न्यायोचित होणार नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत यांच्या वकिलांनी न्यायालयात हा अर्ज सादर केल्यानंतर न्यायालयाने राहुल शेवाळे यांना यावर आपले लेखी म्हणणे मांडा असे निर्देश दिले. या प्रकरणी पुढील सुनावणी 16 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे