महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

योगी सरकारच्या दंडेलशाहीविरोधात काँग्रेसची मंत्रालयाशेजारी जोरदार निदर्शने

उत्तर प्रदेश सरकारच्या या दडपशाहीविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले.

काँग्रेस
काँग्रेस

By

Published : Oct 1, 2020, 6:48 PM IST

Updated : Oct 1, 2020, 7:02 PM IST

मुंबई - उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी हाथरस येथे निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली व त्यांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र निषेध करत प्रदेश काँग्रेसच्या वतीने मंत्रालयाशेजारी असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने केली. यावेळी मोदी सरकार आणि योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून काँग्रेसच्या नेत्यांनी परिसर दणाणून सोडला होता.

प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण

राहुल गांधी यांना करण्यात आलेली धक्काबुक्कीही निषेधार्ह असून लोकशाहीला काळिमा फासणारी आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी योगी सरकारच्या कारवाईचा निषेध केला. हाथरस येथील पीडितेला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील, असा इशारा थोरात यांनी दिला.

हेही वाचा -सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ताडोबाच्या कोअर झोनची सफारी; पर्यटन आणि रोजगाराला मिळणार चालना

उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्याशी केलेल्या दंडेलशाहीचा महाराष्ट्र काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या दडपशाही विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. या आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आमदार झिशान सिद्दीकी माजी मंत्री अनिस अहमद, बाबा सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, सचिन सावंत, प्रदेश सचिव राजाराम देशमुख, झिशान अहमद यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी उत्तर प्रदेशातील भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, उत्तर प्रदेशात कायद्याचे नाही तर जंगलराज आहे, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. उत्तर प्रदेशात महिला व मुलींच्या अब्रूचे लचके तोडले जात आहेत. हाथरस येथील अमानवीय घटनेतील आरोपींनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश सरकार करत आहे. त्यामुळेच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना हाथरस येथे जाऊ दिले जात नाही. काँग्रेस पक्ष पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आम्ही देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. भाजप सरकारच्या दडपशाहीला आम्ही भीक घालत नाही. पीडित कुटुंबीयाला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष सरकार विरोधात संघर्ष करत राहील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

हेही वाचा -एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी केले होम-हवन

Last Updated : Oct 1, 2020, 7:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details