मुंबई : Rahul Narwekar Met CM : मराठा आरक्षणावरुन राज्यातील वातावरण तापलं असताना, दुसरीकडं सत्तासंघर्षावरुन ठाकरे गट, शिंदे गट (शिवसेना) यांच्यातील लढाई न्यायालयात सुरू आहे. आमदार अपात्र सुनावणी प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिरंगाई करत असून, सुनावणीस विलंब लावत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तसंच सर्वोच्य न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना खडेबोल सुनावले होते. याप्रकरणी ३० ऑक्टोबरपर्यंत निर्णय द्या, ही तुम्हांला शेवटची संधी असेल. ३० तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास यावर आम्ही निर्णय घेऊ, असं न्यायालयाने म्हटलं होतं. याप्रकरणी न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली होती.
आमदार अपात्र प्रकरणावर चर्चा? : दरम्यान, आमदार अपात्रेप्रकरणी येत्या 30 ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडणार आहे. परंतु, त्याआधीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलीय. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात आमदार अपात्र प्रकरणावर चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती आहे. यावेळी बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी सुरक्षा रक्षकांनाही बाहेर ठेवलं होतं, अशी माहिती मिळतेय.