मुंबई : खरी शिवसेना कुणाची? या वादावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच निकाल दिला. या प्रकरणावर एकूण 34 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या 34 याचिका 6 याचिकांमध्ये एकत्रित करून अध्यक्ष नार्वेकर यांनी हा निकाल दिला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना हा अधिकृत पक्ष एकनाथ शिंदे यांचाच असल्याचं जाहीर केल्याने आणि ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेलाय तर शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय. मात्र, त्याआधी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओवरून आता राहुल नार्वेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पक्षाच्या घटना दुरुस्तीवर लक्ष दिलं पाहिजे : खासदार अरविंद सावंत यांनी 2013 सालातील पक्षांतर्गत निवडणुकीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हेदेखील दिसत आहेत. या व्हिडिओबाबत अरविंद सावंत यांनी 2013 साली तत्कालीन सर्व नेत्यांसोबतच राहुल नार्वेकरदेखील उपस्थित होते. असं असतानादेखील त्यांनी पक्ष शिंदे गटाला कसा दिला? असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावर राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे की, ''ठाकरे गटानं या जुन्या गोष्टी न काढता पक्षाची घटना दुरुस्तीवर लक्ष दिलं पाहिजे.''
कागदपत्रे सादर करायला हवी होती : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष आणि आमदार अपात्रतेबाबत निर्णय दिल्यानंतर, ठाकरे गटाकडून जुने व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटासह राहुल नार्वेकर देखील दिसत आहेत. यावर बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, ठाकरे गटानं असे व्हिडिओ दाखवण्यापेक्षा जेव्हा सुनावणी सुरू होती, त्यावेळी घटना दुरुस्ती करून त्यासंबंधीची कागदपत्रे सादर करायला हवी होती.
फोटो शेअर करण्याची वेळ आली नसती : सन 2018 साली ठाकरे गटाने पक्षाच्या घटनेत खरंच दुरुस्ती केली होती का? मला सांगा मी नेमकी कोणती घटना ग्राह्य धरायची? ठाकरे गटाने सादर केलेली की तत्कालीन शिवसेना पक्षाने 1999 साली निवडणूक आयोगात घटना सादर केलेली घटना ग्राह्य धरायची? या सर्व सुनावणीत 2013 च्या निवडणुकीचा आणि निवडीचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे ठाकरे गटाने 2013 चे व्हिडिओ दाखवू नये. मी कुठे होतो? काय करत होतो? हे न दाखवता ज्यावेळी या सर्व प्रकरणाची सुनावणी सुरू होती त्यावेळी आपल्या पक्षाच्या घटनेत खरंच काही बदल करून ते आमच्यासमोर सादर केले असते तर आज हे असे जुने फोटो शेअर करण्याची वेळ आली नसती, असा टोलाही त्यांनी लगावलाय.