मुंबई Rahul Narvekar On Uddhav Thackeray: शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी १० जानेवारी रोजी दुपारी चार वाजता निकाल अपेक्षित आहे. दोन दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं राजकारण तापलं आहे. राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. न्यायाधीश आरोपीला भेटायला गेले तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
तरही मी कायद्यानुसारच निर्णय घेईल : उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब या सर्वच नेत्यांनी नार्वेकरांवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. त्यांच्या टीकेला उत्तर देताना राहुल नार्वेकरांनी सांगितलं की, मागील ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांशी नियोजित भेट होती. जर एखाद्या महत्त्वाच्या कारणाने मी मुख्यमंत्र्यांना भेटलो तर, त्याचा अर्थ मी त्यांना भेटू नये असा होतो का? नार्वेकर पुढं म्हणाले, काही लोक निर्णयप्रक्रियेवर दबाव आणण्यासाठी माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत असले तरी, मी कायद्यानुसारच निर्णय घेणार आहे, मुंबईत प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
आरोप करून संविधानाचा अपमान केला आहे : एकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्र निर्णय प्रक्रियेवर लागलेलं असताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकांतात भेट घेतल्यानं, या भेटीवरून राजकीय वर्तुळात अनेक खलबत्तं सुरू झाली आहेत. या भेटीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी, "न्यायाधीश जर आरोपीला भेटायला गेले, तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी. आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काय लागणार, हे जनतेला समजलं आहे." असा खोचक टोला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आज पत्रकार परिषदेमध्ये लगावला. यावर बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले आहेत की, उद्धव ठाकरे यांनी आरोप करून संविधानाचा अपमान केल्यासारखं आहे. उद्धव ठाकरे यांना विधानसभा अध्यक्षांचे अधिकार तसेच त्यांची जबाबदारी याविषयी पूर्ण माहिती असून सुद्धा ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. तसेच जे काही आरोप होत आहेत त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. जनतेला न्याय भेटेल असाच निर्णय घेतला जाईल. यामध्ये कायद्यांच्या तरतुदीची कुठेही तोडमोड झालेली नसून माझा निर्णय हा पूर्णतः कायद्याच्या मर्यादेतच राहील.
भेटीवर राजकारण करण्याचं काही कारण नाही: नार्वेकर पुढे म्हणाले की, सर्वांना कोर्टात जाण्याचा अधिकार असून माझा निर्णय हा कायद्याला धरून असणार आहे. हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अखेर मी सुद्धा एका मतदार संघाचा आमदार असून मतदारसंघातील कामे पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणं मला गरजेचं होतं. ही भेट पुरवनियोजित असून ३ जानेवारीला ठरली होती. परंतु तेव्हा माझी तब्येत बरी नसल्यानं भेट झाली नाही. म्हणून मी रविवारी त्यांची भेट घेतली. त्यामुळं या भेटीवर राजकारण करण्याचं काही कारण नाही. तसेच शिवसेनेच्या ज्या आमदारांवर अपात्रतेचे आरोप आहेत त्यांना देखील यापूर्वी मी भेटलोच आहे. मग याचा अर्थ असा होतो का, की मी माझा निर्णय बदलणार आहे. कायद्यात, संविधानात जे योग्य असेल तेच माझ्याकडून होईल असेही नार्वेकर म्हणाले.
हेही वाचा -
- शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात आमची बाजू भक्कम, निकालाची काळजी नाही - देवेंद्र फडणवीस
- आमदार अपात्र प्रकरणी मराठीवरुन घोळ; दोन्ही गटांच्या वकिलांमध्ये खडाजंगी
- मुख्यमंत्री म्हणतात मेरिटप्रमाणे निकाल लागेल, वाचा विधानसभा अध्यक्षांचा काय असू शकतो निकाल