मुंबई Rahul Narvekar On MLA Disqualification : सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना खडेबोल सुनवल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी आपली भूमिका माध्यमांपुढं मांडली. कोणता विकास असंवैधानिक मानला जाईल, हे शोधून काढण्याची गरज असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेच्याबाबत राहुल नार्वेकर हे बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडणार :शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अपात्र करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर लवकर सुनावणी न घेतल्यानं ठाकरे गटाचे आमदार सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडेबोल सुनावले आहेत. मात्र विधानसभा अध्यक्षांची भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. बेकायदेशीर काय हे निश्चित करण्यात येईल, त्यानंतरच पुढील पावले उचलता येथील, असंही राहुल नार्वेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.