मुंबई :मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाने जोर धरला आहे. मात्र मुसळधार पाऊस असला तरी विराट मोर्चा निघेल, असे आवाहन ठाकरे गटाने केले होते. शनिवारी बरोबर साडेचार वाजता मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर हजारोंच्या संख्येने आलेल्या मोर्च्याचे सभेत रुपांतर झाले. विशेष म्हणजे सभेला सुरुवात झाली आणि तासभर पावसानेही उसंत घेतल्याने शिवसैनिकांचा उत्साह वाढला. युवानेते आदित्य ठाकरे हे मोर्चात सहभागी झाले होते. हातात भगवे झेंडे, फलक घेऊन शेकडोंच्या संख्येने शिवसैनिकांनी पालिकेसमोर धडक दिली. त्यावेळी पालिकेसमोरील वातावरण अवघे भगवेमय झाले होते.
सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन प्रकरण : सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियान प्रकरणात भाजपाने राहुल कनाल यांचे नाव गोवल्यानंतर थेट शिंदे गटात प्रवेश केल्याचे बोलले जात होते. राहुल कनाल यांनी यावर प्रत्युत्तर दिले. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या हत्या प्रकरणाचा सविस्तर तपास करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. माझे नाव त्यात आल्यास राजकारण सोडेन, असा इशारा दिला.
ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के : शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील सत्ता गमावावी लागली. त्यानंतर ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक जोरदार धक्के बसत आहेत. 1 जुलै रोजी माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र, आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे राहुल कनाल यांनी ठाकरे गट सोडून शिंदें गटाची कास धरली. दरम्यान, सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या हत्या प्रकरणाचा सविस्तर तपास करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याचे कनाल म्हणाले. तसेच, माझे नाव त्यात असल्यास राजकारण सोडू, असा दावा केला.