नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीमध्ये त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. तसेच काँग्रेस पक्ष लोकसभेत विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागाही मिळवू शकला नाही. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन नेत्यांची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
या बैठकीत राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करण्याबाबच्या शक्यतेवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून या भेटीकडे वेगवेगळ्या अंगाने पाहिले जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला ५२ जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आले तर विरोधी पक्षनेते पद काँग्रेस पक्षाला मिळू शकते. विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी पक्षाला ५४ जागा मिळणे गरजेचे होते.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत. मात्र, काँग्रेस वर्कींग कमिटीने सर्वानुमते त्यांचा राजीनामा नाकारला आहे. त्यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे पक्षातील जेष्ठ नेत्यांनी राहुल गांधींना सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले की, राष्ट्रवादीच्या काँग्रेस सोबतच्या विलीनीकरणाचा कोणताही विषय आमच्यासमोर असून यासंदर्भात दाखवण्यात येत असलेल्या बातम्या निराधार आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यामध्ये आज झालेल्या चर्चेत देशातील राजकीय स्थितीवर आणि पुढील आव्हानावर चर्चा झाली. मात्र, या चर्चेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा कोणताही विषय नव्हता, असा दावा नवाब मलिक यांनी केला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची विलीनीकरण झाले तर केंद्रात दोन्ही पक्षांना मिळून विरोधी पक्षनेते पद मिळू शकते. तसेच काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाल्यास केंद्रात आणि राज्यातही राष्ट्रवादीची एक वेगळी ओळख आणि ताकद निर्माण होईल, असेही बोलले जात आहे. मात्र याविषयी कोणतीही शक्यता नसल्याचे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.