मुंबई : अदानींच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. अदानी यांनी स्वत:च्या कंपनीत शेअरची गुंतवणूक केली आहे. आर्थिक बाबींमध्ये पारदर्शकता हवी आहे. जगामध्ये भारताची नाचक्की या प्रकरणामुळे झाली आहे. भारताच्या प्रतिमेला तडा गेला आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
आदानीच्या कंपनीत चीन व्यक्तीची गुंतवणुक कशी? : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीत चीनमधील एका व्यक्तीनं गुंतवणूक केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. अदानी भारतात विकास प्रकल्प, संरक्षण क्षेत्रात काम करत आहे. मात्र, त्यांच्या कंपनीमध्ये चीनी व्यक्तीनं गुंवतणूक कशी केली? असा सवाल गांधी यांनी उपस्थित केला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर खुलासा करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
सर्व प्रकरणाची चौकशी करा :देशामध्ये सध्या जी -20 चं वातावरण आहे. जगभरातील अनेक देशातून अनेक तज्ञ या बैठकीसाठी देशात येत आहे. या वातावरणात जगातील नामांकित वृत्तपत्रांमध्ये आज अदानी समूहातील गुंतवणी बाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळं देशाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत खुलासा करणं गरजेचं आहे. मात्र, पंतप्रधान यावर बोलायला तयार नसल्यास म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी जेसीपी स्थापन करून करावी, अशी मागणी त्यांनी केली .
मोदींचे अदानी कुटुंबांशी संबंध :पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अदानी कुटुंबांशी संबंध असल्याचं एका जागतिक वृत्तपत्रात म्हटलयं. शेअर्सची किंमत वाढवण्यासाठी त्यांनी आपल्याच कंपनीत शेअरची खरेदी केल्याचं माध्यमात म्हटलयं. या पैशाच्या जोरावरच अदानी विमानतळ, पोर्ट्स खरेदी करत आहेत. हे कुणाचे पैसे आहेत? असं राहुल गांधी म्हणाले. या संदर्भात संसदीय संयुक्त समितीच्या वतीने कारवाई करू, असं पंतप्रधानांनी जाहीर करायला हवं, असं देखील गांधी यांनी म्हटलं आहे.