मुंबई - काँग्रेसची सत्ता आल्यास मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱयांचे पुनर्वसन करताना त्यांना किमान ५०० चौरस फुटाचे घर दिले जाईल, असे महत्वाचे आश्वासन राहुल गांधींनी शुक्रवारी दिले. मुंबईकरांना प्रभावित करण्यात मोठी भूमिका बजावणारे आश्वासन ३ राज्यातील कर्जमाफीच्या आश्वासनासारखे क्रांतिकारी ठरू शकते.
मुंबईत लाखो लोक झोपडपट्टीत राहतात आणि त्याचे पुनर्वसन हा येथील सर्वात ज्वलंत विषय आहे. सध्या झोपडपट्टीवासीयांचे पुनवर्सन करताना २३९ चौरस फुटांचे घर दिले जाते. राहुल गांधी यांनी घराचे क्षेत्रफळ जवळजवळ दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचा निवडणूकीत लाभ होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
"आम्ही छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेशात सत्ता आल्यास १० दिवसात कर्जमाफीचा शब्द दिला होता. १० दिवसांच्या आत तो शब्द पाळला. २०१९ ला आम्ही केंद्रात आणि राज्यातही सत्तेत येऊ आणि ५०० चौरस फूट देण्याचा शब्द पूर्ण करू," असे त्यांनी जाहीर करताच मैदानात उपस्थित हजारो लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. धारावी आणि अन्य ठिकाणी झोपडपट्टीत राहणाऱ्यांना याचा लाभ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या भाषणात त्यांनी अनेकदा धारावीचा उल्लेख केला. राहुल गांधी यांच्या भाषणानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या भाषणात ५०० चौरस फुटांची घरे भाडेकरूंनाही दिली जातील, अशी पुष्टी जोडली.
छोट्या व्यापाऱ्यांना साद
जीएसटीचा लाभ केवळ मूठभर श्रीमंत व्यापारी आणि प्राप्तिकर विभाग यांना झाला, असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. "जीएसटीचा लाभ झाला का हे तुम्ही मुंबईत व्यापाऱ्यांना विचारा. जर कुणाचा फायदा झाला असेल तर माझ्याकडे घेऊन या," असेही ते म्हणाले.