मुंबई- इंग्रज एकेकाळी भारतातील पैसा लुटून आपल्या देशात घेऊन जायचे आता केंद्रातील मोदी सरकार देशातील गोरगरिबांचा पैसा लुटते आणि येथील श्रीमंताच्या घशात घालते, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप आणि मोदी सरकारवर केली. आत्ताच सर्वांनी एकत्र होऊन सावध व्हावे, देशातील परिस्थिती बदलायची असेल तर काँग्रेसच्या उमेदवारांना जिंकून आणा, असेही आवाहन त्यांनी केले.
साकीनाका येथील काँग्रेसचे उमेदवार नसीम खान तसेच वांद्रे येथील उमेदवार सिद्दिकी आदी उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची मुंबईत पहिली प्रचारसभा झाली. या प्रचार सभेत राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गोर-गरिबांचा पैसा विविध माध्यमातून श्रीमंतांना दिला जात आहे. आता सावध झाले नाही तर सर्वकाही संपून जाईल, असा इशाराही राहुल गांधी यांनी मुंबईकरांना दिला.
हेही वाचा - मोदींनी ५ वर्षांत जे देशाचे नुकसान केले, ते काँग्रेसने कधीच केले नाही - राहुल गांधी
नरेंद्र मोदी हे ज्यावेळी केंद्रात पहिल्यांदा जिंकून आले होते, त्यावेळी ते मनमोहन सिंग यांची खिल्ली उडवत होते. पण, आता देशाची अर्थव्यवस्था काय झाली हे सत्य तुमच्यासमोर आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात कोणत्याही देशात गेले तर भारताच्या अर्थव्यवस्थेवर ते बोलायचे की, भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकेचा मुकाबला करू शकते. परंतु, आता मोदी यांनी ती रसातळाला पोचवली. मनमोहन सिंग यांच्या काळात जगभरात भारताची एक चांगली प्रतिमा होती. परंतु, आज कोणी येऊन गुंतवणूक करायला तयार नाही. ही वस्तुस्थिती असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला.
देशातील समस्यांवर मोदी काही बोलत नाहीत. नोट बंदीच्या काळात सर्व गरीब बँकांसमोर रांगा लावून उभे होते. मात्र, सुट बूटवाले निरव मोदी, विजय माल्ल्या हजारो कोटी बुडवून पळून गेले. त्यावर मोदी काहीही बोलले नाहीत. देशात आणि मुंबईतील छोटे दुकानदारांना संपवून टाकले, उद्योग संपले, ऑटोमोबाईल क्षेत्र आज बंद पडत आहेत. हेच उद्योजक लोक आता एकमुखाने बोलत आहेत, नरेंद मोदी यांनी आम्हाला संपवून टाकले. त्यामुळे मोदी यांनी बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यांवर दोन शब्द बोलावे, पीएमसी बँकेवर बोलावे, या बँकेचे संचालक कोण आहेत, त्यावर भाषण द्यावे, असे आव्हान राहुल गांधी यांनी मोदींना केले.
हेही वाचा - आदित्य ठाकरेंचे मतदारांना साकडे; वरळी मतदारसंघातून काढली रॅली
मोदींवर हल्ला बोल करताना राहुल गांधी म्हणाले की, मेक इन इंडिया कुठे आहे? आता देशात, सगळीकडे चायना दिसत आहे. मोदी मेड इन इंडिया, मेक इन इंडिया बोलत आहेत. मोदींनी काही दिवसांपूर्वी एक लाख २५ हजार कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स माफ केला. मग गरिबांचा किती केला? असा सवाल करत मोदींवर जोरदार टीका केली. राफेल मध्ये चोरी झाली हे सगळ्यांना माहीत आहे. त्यात संरक्षण खात्याने पंतप्रधान हस्तक्षेप करत आहेत, हे नमूद केले होते. राफेल नाव हे यांना कायम टोचत असते, त्यामुळे, यातील सत्यापासून मोदी, शाह दूर जाऊ शकत नाहीत. आज देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रोजगार नाहीत, शेतकरी आत्महत्या करत आहेत. मी गुजरातला गेलो माझ्यावर खटले दाखल केले. मला काही व्यापारी बोलले आमच्याकडे इन्स्पेक्टर राज आणले आहे. आम्हाला काम करणे कठीण झाले आहे. मुंबईतही अनेक छोटे उद्योग बंद झाले. यामुळे बेरोजगारी वाढली, त्यामुळे भाजप सरकारला खाली खेचण्यासाठी या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या संख्येने जिंकून आणा असे आवाहन त्यांनी केले.