महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरेगाव भीमा विजयस्तंभाला गर्दी करू नका, घरातूनच अभिवादन करा - राज्य सरकारचे आवाहन - कोरेगाव भीमा शौर्य दिन न्यूज

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या ठिकाणी एक जानेवारीला गर्दी करू नका. अभिवादन कार्यक्रमाचे दूरदर्शन आणि अन्य समाज माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातूनच विजयस्तंभाला अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Rahul dambale on Koregaon Bhima Shaurya Din 2020
कोरेगाव भीमा विजयस्तंभाला गर्दी करू नका, घरातूनच अभिवादन करा - राज्य सरकारचे आवाहन

By

Published : Dec 22, 2020, 9:04 PM IST

मुंबई - जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या ठिकाणी एक जानेवारीला गर्दी करू नका. अभिवादन कार्यक्रमाचे दूरदर्शन आणि अन्य समाज माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातूनच विजयस्तंभाला अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विजय स्तंभाचे ऐतिहासिक महत्त्व -
कोरेगाव भीमा विजय स्तंभाला ऐतिहासिक अस महत्व आहे. पेशवा आणि इंग्रजांच्या लढाई दरम्यान तत्कालीन महार सैनिकांनी इंग्रजांच्या बाजूने लढाई लढून पेशव्यांचा पराजय केला होता. विजय स्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली होती. त्यामुळे आंबेडकरी जनता दरवर्षी एक जानेवारीला लाखोंच्या संख्येने पुणे येथील कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला भेट देऊन अभिवादन करते. काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी दोन गटात दंगलही झाली होती. यामुळे यादिवशी विशेष असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत असतो.

राहुल डंबाळे बोलताना...
यंदा साध्या पद्धतीने कार्यक्रम -
यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने कार्यक्रम साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून निर्बंध घालण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणी व आसपासच्या परिसरात कोणत्याही प्रकारची सभा घेणे, खाद्यपदार्थ व पुस्तकांचे स्टॉल लावणे यावरही निर्बंध घालण्यात आले असल्याचे परिपत्रकात स्पष्ट केले आहे. या सूचनांचे पालन होत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी राज्याच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन विभाग, आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, संबधित महापालिका, पोलीस आणि स्थानिक प्रशासनावर सोपविण्यात आली आहे.
आंबेडकरी संघटनांकडून समर्थन -
राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिन, आषाढी, कार्तिकी वारी, गणेशोत्सव, नवरात्र, ईद हे सण साजरे करण्याबाबत खबरदारी म्हणून सूचना करण्यात आल्या होत्या. त्या धर्तीवर अभिवादन कार्यक्रमासाठी गृह विभागाने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. कक्षाधिकारी दीपक खरात यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला नागरिकांना गर्दी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाचे समर्थन विविध संघटनांनी केले असून, नागरिकांनी विजयस्तंभाला घरूनच अभिवादन करण्याचे आवाहन कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details