मुंबई : आषाढी वारीनिमित्त सारी पंढरी गजबजली आहे. सगळीकडे चैतन्याचे भक्तिमय वातावरण आहे. वारकऱ्यांमध्येदेखील उत्साह दिसत आहे. श्री विठ्ठल भक्तांनादेखील माऊलीची ओढ लागली आहे. आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक आणि वारकरी दिंड्यांच्या आणि पालख्यांच्या माध्यमातून पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या या लाखो भाविकांच्या आणि वारकऱ्यांसाठी राज्य सरकार सर्व सुविधा पुरवण्यास सज्ज आहे. वारी मार्गामध्ये ठिकठिकाणी शौचालय आणि स्नानगृहे सरकारने उभारली आहेत. त्याचा लाभ या सर्व वारकऱ्यांना झाला आहे. प्रशासनाने वारकऱ्यांसाठी आरोग्य आणि स्वच्छता याबाबत पुरेशी काळजी घेतली आहे. वारकऱ्यांची कुठेही गैरसोय होणार नाही याबाबत राज्य सरकार दक्ष असल्याचे, विखे पाटील यांनी सांगितले.
समन्वय समितीच्या माध्यमातून आढावा : पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी टाळ मृदंगाच्या गजरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सोयी सुविधा योग्य रीतीने पुरवता याव्यात. त्यांच्या राहण्याची, खाण्याची आणि स्वच्छतेची पुरेशी काळजी घेता यावी यासाठी, राज्य सरकारच्या वतीने एक समन्वय समिती नेमण्यात आली आहे. या समन्वय समितीमध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचाही समावेश आहे. तिघांनी मिळून या सर्व सोयी सुविधांचा सातत्याने आढावा घेतला आहे. त्यामुळे कुठेही वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचे, विखे पाटील यांनी सांगितले.
महिलांसाठी चार हजार स्वच्छतागृहे : दिंड्यांमधून आणि पालख्या मधून पंढरपूरच्या दिशेने येणाऱ्या हजारो महिला वारकरी आणि भाविकांसाठी जागोजागी स्वच्छतागृहे आणि स्नानगृहे उभारण्यात आली आहेत. महिलांसाठी 4000 स्वच्छतागृह आणि स्नानगृह उभारण्यात आली आहे. त्यामुळे महिला वारकऱ्यांची योग्य सोय झाली आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात दाखल झालेल्या दोन्ही मानाच्या पालकांचे स्वागत करता आले. पंढरपुरात येणाऱ्या सर्व वारकरी आणि भाविकांचे आपण स्वागत करत असून, त्यांच्या सोयी सुविधांमध्ये कुठेही कमतरता होणार नाही, याची दक्षता वारी पार पडेपर्यंत घेतली जाणार असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.