मुंबई-वांगणी रेल्वे स्थानकावर रेल्वे पॉईंट्समन मयूर शेळके यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून ६ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला. दोन दिवसांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने मयूर यांच्या कामगीरीची दखल घेतली. दरम्यान, या घटनेमुळे रेल्वेच्या तोकड्या सुरक्षा यंत्रणेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादलेल्या निर्बंधांमुळे तुर्तास सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासास मुभा नाही. रेल्वे स्थानकांवर ओळखपत्र बघूनच प्रवेश देण्यात येत आहे. मात्र मध्य रेल्वेवर सरसकट प्रवासी प्रवास करत असल्याचे चित्र या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. वांगणी रेल्वे स्थानकावरील या घटनेत अंध महिलेला प्रवेश कसा मिळाला ? रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा रक्षक कुठे होते ? या महिलेवर कोणाचेच लक्ष कसे गेले नाही? महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित महिलेसोबत चिमुरडा दिसून येतो. रेल्वेने लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना प्रवासास मज्जाव केलेला असतानाही हा चिमुरडा स्थानकावर पोहोचलाच कसा? असे अनेक गंभीर प्रश्न या घटनेनंतर विचारले जाऊ लागले आहेत. आज मध्य रेल्वे मार्गावर बरेचशे दिव्यांग प्रवासी प्रवास करताना दिसून येत आहेत. मात्र त्यांना आळा घालण्यासाठी किंवा त्यांच्या सुरक्षेची कसलीही जबाबदारी रेल्वेकडून घेण्यात येत नाही. इतकंच नव्हे तर रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणा किंवा कसलाही बंदोबस्त दिसून येत नाही. वांगणी रेल्वे स्थानक घटनेतील ही महिला दृष्टिहीन होती. ती जिवाच्या आकांताने ओरडली. सुदैवाने मयूर यांचे तिच्या हाकेकडे लक्ष गेले आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी मुलाला वाचवले. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, रेल्वेच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
ही घटना 17 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी घडली. त्यानंतरही या घटनेचा रेल्वेला थांगपत्ता नव्हता. प्रवासी संघटनेकडून मयूर शेळके यांच्या कार्याची दखल घेतली गेली आणि नंतर स्थानिक वृत्तपत्रात याबाबत वृत्तांक करण्यात आले. वांगणी स्थानकात पॉईंट्समन मयूर शेळके यांचे कौतुक झाले. जेव्हा प्रवासी संघटनेकडून ही बाब लक्षात आणून दिली गेली तेव्हा वांगणी स्थानकांवरच्या घटनेचा व्हिडीओ रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक आणि रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला, आणि त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले आहे. मयूरचे कौतुक व्हायलाच हवं, मात्र रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आता तरी रेल्वे स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा वाढवायला हवी त्याचबरोबर दिव्यांग प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे आता गरजेचे झाले आहे.