मुंबई -कृषी कायद्याविरोधात संपूर्ण देशात तीव्र पडसाद उमटत आहेत. या आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळावा, यासाठी पंजाबच्या पटियालामधून तरुण शेतकरी मजिंदर सिंग या तरुणाने आपल्या चार चाकी गाडीने "किसान काफीला" काढला आहे. तब्बल शंभर दिवसात विविध राज्यातून आपल्या चारचाकी गाडीने 15 हजार किलोमीटर अंतर कापत त्या तरुणाने आज मुंबई गाठली आहे. त्यांच्याशी ईटीव्ही भारताच्या प्रतिनिधीने बातचीत केली आहे.
15 हजार किलोमीटर प्रवास-
तरुण शेतकरी मजिंदर सिंग यांनी ईटीव्ही भारताला सांगितले, की केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ऐतिहासिक आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला देशातील प्रत्येक राज्यातून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळावा आणि कृषी कायद्यांना विरोध व्हावा म्हणून "किसान काफीला" ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला प्रत्येक राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंजाब पटियालामधून एका चार चाकीतून सुरू झालेली ही मोहीम आता उत्तर-पूर्व आणि दक्षिणेकडील राज्यांमधून 15 हजार किलोमीटरचा प्रवास करून मुंबईत पोहोचली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भाषेची अडचण येऊ नयेत, म्हणून पश्चिम बंगाल नागालँड अशा विविध राज्यांमधील विद्यापीठातील विद्यार्थी व कार्यकर्त्यांकडून मदत केली जात आहे.
स्थानिक भाषेतील पत्रकांचा आधार-
मजिंदर सिंग यांनी सांगितले की, प्रवासात मिळेल त्या शेतकऱ्यांमध्ये नवे कृषी कायदे त्याचे दुष्परिणाम किमान आधारभूत किमतीचे महत्व अशा सर्व मुद्द्यावर जनजागृती करत आहोत. त्यामुळे दिल्लीत सुरू झालेल्या आंदोलनास विविध राज्यातील शेतकऱ्यांकडून मिळणार्या पाठिंब्यामुळे नक्कीच यशस्वी ठरेल असा विश्वास आहे. ही मोहीम फत्ते करण्यासाठी स्थानिक भाषेतील पत्रकांचा आधार घेत आहेत. त्यासाठी त्या-त्या राज्यातील विद्यार्थी, कार्यकर्ते, शेतकरी मदत करत असल्याचेही त्यांनी सांगितले.