मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल 27 वर्षे स्वराज्याचा कारभार राजगडावरुन चालवला होता. राजगडाचे ऐतिहासिक महत्व, वेल्हे आणि महाराष्ट्रवासियांच्या मनातले राजगडाबद्दलचे आदराचे स्थान लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करण्यात यावे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
महसुलमंत्री, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र: वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करावे. पुणे जिल्हा परिषदेच्या 22 नोव्हेबर 2021 रोजीच्या सर्वसाधारण सभेत वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करण्याबाबत सकारात्मक ठराव झाला आहे. त्यावेळी वेल्हे तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींनी, तालुक्याचे नामांतर राजगड करण्याचे ठराव सादर केले होते. किल्ले राजगडाबद्दल वेल्हे तालुकावासियांच्या, तमाम महाराष्ट्रवासियांच्या मनात असलेली आदर, अभिमानाची भावना लक्षात घेऊन वेल्हे तालुक्याचे नामांतर तातडीने करण्यात यावे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. वेल्हे तालुक्यातील राजगड या किल्ल्याशी तालुक्यामधील तमाम नागरिकांचे जिव्हाळयाचे संबध आहे. सदर किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम राजधानी देखील होता. नामकरण करावा अशी वेल्हे तालुक्यातील नागरिकांची इच्छा आहे.