महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pumping Stations in Mumbai: मुंबईकरांना आणखी काही काळ साचलेल्या पाण्याचा त्रास सहन करावा लागणार; 'हे' आहे कारण

मुंबई महानगरपालिकेने साचलेल्या पाण्याचा समस्या लक्षात घेत ८ पम्पिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र ८ पम्पिंग स्टेशन पैकी ६ पम्पिंग स्टेशन उभारली गेली आहेत. तर २ पम्पिंग स्टेशनचे काम रखडल्यामुळे मुंबईकरांना आणखी काही काळ साचलेल्या पाण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

By

Published : Feb 25, 2023, 7:18 PM IST

Pumping Stations in Mumbai
पम्पिंग स्टेशनची उभारणी सुरू

मुंबई: मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी साचते. यावर उपाय म्हणून पालिकेने ब्रिमस्टोव्हेड प्रकल्प तसेच पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी ८ पम्पिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला. ८ पैकी ६ पम्पिंग स्टेशन सुरु झाले आहेत. मात्र मोगरा तसेच माहुल या २ पम्पिंग स्टेशनचे काम रखडले आहे. या दोन्ही स्टेशनला नेमण्यात आलेल्या सल्लागारांचा कालावधी संपल्याने नव्याने सल्लागार नेमावा लागणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणखी काही काळ पावसाळ्यात पाणी साचण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

६ पम्पिंग स्टेशन सुरु: गेल्या काही वर्षात मुंबईमध्ये कमी तासात जास्त पाऊस पडत असल्याचे नोंद होत आहे. मुसळधार पावसादरम्यान समुद्राला भरती असल्यास शहरात पाणी साचून राहते. भरतीच्या वेळी हे पाणी समुद्रात वाहून जात नाही. यासाठी ८ पम्पिंग स्टेशन उभारून हे पाणी समुद्रात सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिकेने ८ पैकी हाजीअली, ईर्ला, लव ग्रोव, क्लीव्हलँड, ब्रिटानिया तसेच गझदरबंध ही सहा पंपिंग स्टेशन बांधून सुरु केली. अंधेरी येथील मोगरा नाल्यावरील उदंचन केंद्राचे व माहूल उदंचन केंद्रांचे काम मात्र जागेअभावी पुढे सरकलेले नाही.


सल्लागार नेमण्यासाठी नव्याने निविदा: अंधेरी येथील मोगरा नाल्यावरील व माहूल येथील उदंचन केंद्राचे काम जागा उपलब्ध नसल्याने रखडलेले आहे. या दोन पम्पिंग स्टेशनच्या उभारणीसाठी सीआरझेड, महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण, वन खाते, जिल्हाधिकारी, मिठागर आयुक्त अशा विविध प्राधिकरणांच्या परवानग्या आवश्यक आहेत. या परवानग्या मिळवण्यासाठी पालिकेने सल्लागारांची नियुक्ती केली होती. सल्लागारांचा कार्यकाळ संपला तरी हे दोन्ही प्रकल्प अद्याप मार्गी लागलेले नाहीत. त्यामुळे सल्लागारांना मुदतवाढ देण्यात आली. मात्र आता मुदतवाढीचा कालावधीही संपला तरी अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा सल्लागार नेमण्यासाठी निविदा मागवल्या असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.


अद्याप काम रखडलेलेच: यापूर्वीही दोन मोगरा व माहुल या दोन उदंचन केंद्रासाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या. मात्र जमीनीचा पेच न सुटल्याने ताबा मिळू शकला नाही. त्यामुळे निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मोगरा उदंचन केंद्र हे नाल्याच्या प्रवाहातच बांधण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र या जागेचाही वाद सुटला नाही, त्यामुळे अद्याप काम रखडलेलेच आहे. आता नव्याने नियुक्त करण्यात येणा-या सल्लागाराच्या काळात हा पेच सुटून हे दोन्ही प्रकल्प मार्गी लागतील असा विश्वास संबंधित विभागातील अधिका-यांनी व्यक्त केला. सल्लागार नियुक्तीसाठी पालिका १९ कोटी रुपये खर्च करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अशी असेल कार्यपद्धती: मोगरा येथे बांधण्यात येणाऱ्या पम्पिंग स्टेशनमुळे समुद्राला भरती असली तरी पावसाचे साचलेले पाणी समुद्रात टाकता येणार आहे. भरतीच्या वेळी समुद्राचे नाल्याद्वारे शहरांमध्ये येऊ नये यासाठी नाल्यामध्ये पूरप्रतिबंधक दरवाजे लावण्यात येणार आहेत. बाराही महिने नाल्यामधून वाहून येणारा कचरा समुद्रामध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी स्वयंचलीत स्क्रिनही बसवण्यात येणार आहे. या पम्पिंग स्टेशनच्या माध्यमातून प्रत्येक सेंकंदाला ४२ हजार लिटर पाणी उपसले जाणार आहे अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई पूरमुक्त होईल: दरवर्षी हिंदमाता व किंगसर्कल येथे पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक बंद होऊन मुंबई ठप्प होते. पावसाचे पाणी साठवण्यासाठी हिंदमाता जवळ दोन ठिकाणी भूमिगत टाक्या उभारण्यात आल्या आहेत. मुसळधार पाऊस आणि समुद्राला भरती असेल त्यावेळी या टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवले जात. भरतीनंतर हे पाणी पम्पिंग स्टेशनद्वारे समुद्रात सोडले जाते. त्यामुळे मागील वर्षाच्या पावसात हिंदमाता येथे पाणी जास्त काळ साचून राहिलेले नाही. येत्या काही वर्षात माहुल व मोगरा पम्पिंगचे काम पूर्ण होईल त्यानंतर मुंबई खऱ्या अर्थानं पूर मुक्त होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा:BMC Doctor Saved Girl Child: जन्मताच 'तिचे' शरीर पडले निळे, मुंबई पालिकेच्या डॉक्टरांनी चिमुकलीला मृत्यूच्या दाढेतून खेचले

ABOUT THE AUTHOR

...view details