मुंबई- मराठवाडा विभागातील 24 राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज (दि. 10 मे) आढावा घेतला. संथ गतीने सुरू असलेल्या कामांविषयी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रखडलेली कामे नियोजित वेळेत आणि दर्जेदारपणे पूर्ण करा, अन्यथा काळ्या यादीत टाकू असा इशारा चव्हाण यांनी दिला. तसेच संबंधित कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
मराठवाड्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामांचा आढावा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, सचिव अनिल गायकवाड, अधीक्षक अभियंता प्रशांत औटी, उपसचिव राजेंद्र रहाणे, मुख्य अभियंता के.टी. पाटील हे उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय महामार्गचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता विनय देशपांडे यांच्यासह औरंगाबाद विभागातील कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
कामे तातडीने पूर्ण करा
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुरू असलेल्या औरंगाबाद विभागातील पैठण ते शिरुर, शिरुर ते खर्डा, खरवंडी ते राजुरी, शिऊर ते वैजापूर - येवला, औरंगाबाद ते सिल्लोड, चिखली ते धाड, परळी ते पिंपळा दही गुडा, पानगाव- धरमपुरी -परळी -इंजेगाव, कोल्हा ते नसरतपूर, नसरतपूर ते बारसगाव, सरसम ते कोठारी, अर्धापूर ते हिमायतनगर, हिमायतनगर ते फुलसांगवी, उस्माननगर ते कुंद्राळ या 14 रस्त्यांचा आढावा तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या अहमदपूर-पिंपला जंक्शन, पिंपला जंक्शन ते मांजरसुंबा, मांजरसुंबा ते चुंबळी फाटा, जहिराबाद ते निलंगा-लातूर, मंठा ते परतूर, परतूर ते माजलगाव, केज ते कुसळंब, शिरड शहापूर ते वसमत, जिंतूर ते परभणी आणि आष्टमोड-टिवतियाल (लातूर ते उदगीर) या महामार्गांच्या कामाचाही आढावा यावेळी घेण्यात आला. या रस्त्यांची कामे अतिशय संथ गतीने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून ही कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात संबंधित कंत्राटदारांना चव्हाण यांनी सूचना केल्या.