मुंबई-कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रेपो दर चार टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत आणि बँकांनी गृहकर्जातील व्याजदरात मोठी कपात केली आहे. गृह कर्जावरील व्याज दर कमी झाल्याने घर खरेदी करणाऱ्यांना चांगली संधी आहे. सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका 6.7 टक्के दराने गृहकर्ज देत आहेत, हा दर गेल्या अनेक दशकांतील सर्वात कमी आहे. या कपातीमुळे आगामी काळात खासगी बँकांवर दबाव वाढेल, असे बँकिंग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बाजारातील वाटा वाचवण्यासाठी खासगी बँका देखील कर्ज स्वस्त करतील.
घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर...बँकांकडून गृहकर्जावरील व्याजदरात मोठी कपात
कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सार्वजनिक बँकांनी गृहकर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी व्याजदर कमी केल्यामुळे खासगी क्षेत्रातील बँकांनाही व्याज दर कमी करावा लागेल, असे चित्र आहे.
सरकारी मालकीची बँक युनियन बँक त्यांच्या ग्राहकांना 6.7 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. त्याचबरोबर बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया गृह कर्जांवर 6.85 टक्के दराने व्याज आकारत आहेत. यासह देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया 6.95 टक्के आणि एलआयसी हाऊसिंग फायनान्स 6.90 टक्के दराने गृह कर्ज देत आहे.
कोरोना संकटामुळे उद्योगाकडून कर्जाची मागणी कमी झाली आहे. अशा परिस्थितीत सरकारी बँका वैयक्तिक कर्ज वाटपावर लक्ष केंद्रित करत आहेत. बँका 700 किंवा त्यापेक्षा अधिक क्रेडिट स्कोअर असलेल्या व्यक्तीस कमी दराने कर्ज उपलब्ध करुन देत आहेत. त्याच वेळी, ज्यांचे क्रेडिट स्कोअर कमी आहेत ते 50 ते 60 बेस पॉईंटद्वारे महाग कर्ज उपलब्ध करुन देत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की खासगी बँका येत्या काही दिवसांत गृह कर्जाचे दरही कमी करतील. घर खरेदीदार या संधीचा फायदा घेऊन त्यांचे ईएमआयचे ओझे कमी करू शकतात.