मुंबई :महाराष्ट्राचे कार्यकारी पोलिस महासंचालक संजय पांडे हे महासंचालक पदावर काम करण्यास अपात्र असल्याची शिफारस, केंद्रीय लोकसेवा आयोगाने केली आहे. लोकसेवा आयोगाने महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस (UPSC recommends names of three officers for the post of Director General ) केली आहे. या तीनपैकी एका अधिकाऱ्यांची महासंचालकपदी निवड करणे बंधनकारक आहे. मात्र जर आयोगाच्या शिफारशी मंजूर न करता संजय पांडे यांनाच पदावर कायम ठेवले आहे. त्यामुळे शनिवार (दि.08) रोजी मुंबई उच्च न्यायालयात या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची राज्य सरकार कडून केलेली नियुक्ती अवैध ( Appointment of DGP Sanjay Pandey is illegal ) आहे. त्यांना या पदावरून हटवण्या करिता यूपीएससीने तीन पत्रं राज्य सरकारला पाठवून दिली आहे. तरी अद्याप हटवण्यात न आल्याने मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक पदी निवड करण्याच्या प्रक्रियेनुसार राज्य सरकारकडून 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांची यादी UPSC ला पाठवण्यात आली होती. त्यानंतर UPSC पॅनलने त्या यादी मधील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची पोलीस महासंचालक पदासाठी शिफारस केली होती. तरी देखील राज्य सरकारने अद्यापही UPSC च्या पॅनल ने दिलेल्या अधिकाऱ्यांची राज्याचे पोलिस महासंचालक पदी नेमणूक केली नाही.
UPSC च्या पॅनल कडून शिफारस करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांपैकी एकाची नियुक्ती पोलीस महासंचालक पदी करता येते, असे नियम असताना देखील राज्य सरकारने अद्यापही या अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही. त्या अधिकाऱ्यांपैकी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे ( Mumbai Police Commissioner Hemant Nagarale ), के. वेंकटेशम आणि रजनीश सेठ यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. मात्र वारंवार पत्र देऊन सुद्धा अद्यापही या अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्याचे पोलीस महासंचालक पदी करण्यात आलेली नाही.
संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. एप्रिल 2021 पासून त्यांच्यावर राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त हंगामी कार्यभार सोपवण्यात आला होता. जो आजवर कायम आहे. मात्र आता पांडे यांना या पदावरून पदच्युत करण्यात यावे, अशी मागणी करणारी ही जनहित याचिका वकील दत्ता माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकाची नियुक्ती करण्याची ( Procedure for appointment of DGP ) एक प्रक्रिया असते. त्यानुसार सध्या पांडे हे राज्याचे हंगामी पोलीस महासंचालक आहेत. त्यांना कायम ठेवण्यासाठीही एक प्रक्रिया असते. राज्यातील 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवावी लागतात.
राज्याचे पोलिस महासंचालक पदाचा तात्पुरता चार्ज सध्या संजय पांडे यांच्याकडे आहे. राज्याला पूर्णवेळ महासंचालक मिळावा या करिता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने याचिकेत असे म्हटले आहे की, UPSC ने दिलेल्या नावांपैकी एकाची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी. तसेच राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक मिळावे, अशी याचिकाकर्त्याने जनहित याचिकेत मागणी केली आहे.