मुंबई- सांगली आणि कोल्हापूर भागात जी पूरस्थिती निर्माण झाली ती अत्यंत गंभीर आहे. आता भविष्यात चांगल्या उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. 'धोरणात्मक बाब म्हणून ज्याप्रमाणे कावेरी रिव्हर अथॉरिटी आहे, त्याच धर्तीवर राज्यात कृष्णा रिव्हर अॅथॉरिटी स्थापन करावी,' अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. या भेटीत आपण मुख्यमंत्री फडवीस यांना काही सूचना केल्या असून त्यात कावेरीच्या धर्तीवर राज्यात कृष्णा रिव्हर अॅथॉरिटी स्थापन करावी आणि ही अॅथॉरिटी हाय पॉवर अथॉरिटी असावी म्हणजे यातून काही राजकीय निर्णय घेण्याचे टळेल. यातून केवळ तांत्रिक आणि धरणाच्या संदर्भात निर्णय घेता येतील, अशी आपण सूचना केली असल्याचेही चव्हाण म्हणाले.
केंद्राकडे जी ६ हजार ८०० कोटी रूपये निधी मागितलेले आहेत, ती रक्कम ही तशी कमी असली तरी ती केंद्राकडून केव्हा निधी येणार माहीत नाही, तोपर्यंत सरकारने आपल्या आस्कमिक निधीतून पैसे काढून राज्यातील जनतेला मदत करण्याची गरज आहे. जनावरे आणि पिकांचे जे नुकसान झालेले आहे, त्यासाठीची भरपाई दिली पाहिजे.