महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालिका रुग्णालयांना तातडीने ऑक्सिजन पुरवठा करा, नगरसेवक हरीश छेडा यांची मागणी

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तातडीने पालिका रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हरीश छेडा यांनी पालिका सभेत केली.

By

Published : Apr 17, 2021, 12:48 PM IST

Mumbai
Mumbai

मुंबई : बोरिवली, दहिसर विभागातील भगवती हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपल्याने कोरोना रुग्णांना इतरत्र हलवण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर आली. याबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित करत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तातडीने पालिका रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हरीश छेडा यांनी पालिका सभेत केली. यावर तातडीने पावले उचलत महापालिका आयुक्तांनी पालिका रुग्णालयांना त्वरित ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

ऑक्सिजनची व्यवस्था करा -

मागील पंधरा दिवसात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे अधिकाधिक ऑक्सिजनची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तरी मुंबई महानगराची स्थिती लक्षात घेता पालिका रुग्णालयांना तातडीने अधिकचा ऑक्सीजन साठा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने त्वरित पावले उचलत ऑक्सिजन पुरवठ्याबाबत योग्यरीत्या आणि वेळीच कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेवक छेडा यांनी महापालिका सभेत केली.

५८ रुग्णांना हलवले -

मुंबईत रुग्णसंख्या वाढत असताना आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता भासत आहे. त्यातच पालिकेने आमच्याकडे ऑक्सिजनचा साठा असल्याचा दावा केला होता. मात्र हा दावा फोल ठरला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याने भगवती रुग्णालयातील २५ रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर आता बांद्रा येथील भाभा रुग्णालयातील ३३ रुग्णांनाही ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बिकेसी कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. आतापर्यंत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तब्बल ५८ रुग्णांना इतर रुग्णालयात हलवावे लागले आहे, असे समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details