मुंबई - येथील चुनाभट्टी पोलीस ठाण्यासमोरील रस्ते अपघात अर्चना पार्टे या 19 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तिला न्याय मिळावा यासाठी नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मात्र, स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
चुंनाभट्टी पोलीस ठाण्यासमोरील ठिय्या आंदोलन आमदारांच्या मध्यस्थीने मागे हेही वाचा-बुलडाण्यात 50 वर्षीय दिव्यांग महिलेची हत्या; मृतदेह विवस्त्रावस्थेत सापडल्याने बलात्काराचा संशय
काल रात्री 9 वाजताच्या दरम्यान चुनाभट्टी येथील धावजी केणी मार्गावरील साईबाबा मंदिराजवळील अरुंद रस्त्यावरून 3 मैत्रिणी बाजारातून काही वस्तू खरेदी करून घरी जात होत्या. त्यावेळी धीरज शांताराम कदम या चालकाच्या ताब्यातील (एमएच 05 बीजे 3920) ह्या असेंट कारने भरधाव वेगात अर्चना पार्टे या मुलीला पाठीमागून जोराची धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, रस्त्याच्या कडेचे सिमेंट ठोकळ्याचे तुकडे करीत कार बाजूच्या चाळीत घुसली. यात अर्चना जबर जखमी झाली. तिला जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपचारापूर्वीच अर्चनाचा मृत्यू झाला. या अपघातात कार चालक व कारच्या आतील व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचा आरोप स्थनिकांनी केला.
आज सकाळीच अर्चनाचे नातेवाईक व स्थनिकांनी चुनाभट्टी पोलीस ठाण्यासमोर सर्वच आरोपींना अटक करण्यात यावी, यासाठी ठिय्या आंदोलन केले. स्थानिकांचा आरोप आहे की, गाडीत चार व्यक्ती होत्या. मात्र, पोलिसांनी 3 लोकांनाच अटक केली. त्या चौथ्या व्यक्तीलाही अटक करण्यात यावी म्हणून नातेवाईक व स्थानिकांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. चुनाभट्टी पोलिसांनी कार चालक धीरज कदम, कार मालक मगरे व एकाला अटक केली. चौथा व्यक्ती हा प्रत्यक्षदर्शी असून त्याचे काही सामान त्या अपघात झालेल्या कारमध्ये असल्याने तो जवळ आला होता, असे स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी सांगितले.