मुंबई- उन्नाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडित महिलेला आरोपींनी जाळून मारले होते. यानंतर संपूर्ण देशात या घटनेचे पडसाद उमटत आहेत. काल मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथे मुंबईतील सामाजिक संघटना एकत्र आल्या. त्यांनी अमित शहा, योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
अमित शहा, योगी आदित्यनाथ राजीनामा द्या, मुंबईत उन्नाव प्रकरणाचे पडसाद - amit shah
अशा प्रकारे एका महिलेची बलात्कार करून हत्या करणे हे फार निंदनीय आहे. हे सरकारी यंत्रणेचे अपयश आहे. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथील बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर उन्नाव येथील पीडित महिलेला गुरुवारी पेटवून देण्यात आले. यानंतर देशात महिला सुरक्षित आहे का? हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. या विरोधात आज मुंबईतील काही सामाजिक संघटनांनी एकत्र मरीन ड्राईव्ह येथे निदर्शने केली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महिलांना देशात सुरक्षित वाटले पाहिजे, अशा उपाययोजना सरकारने राबविल्या पाहिजे, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली.
महिलांवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबत कडक पावले उचलावी. हैदराबाद येथील बलात्काराच्या आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला होता. अशा प्रकारे न्याय मिळणे चुकीचे आहे. न्याय प्रक्रियेत न्याय मिळाला हवा होता, असे सामाजिक कार्यकर्त्या विद्या विलास यांनी सांगितले.
उन्नाव येथील सामूहिक बलात्कार पीडित महिलेला आरोपींनी जाळून मारले. अशा प्रकारे एका महिलेची हत्या करण्यात हे खूप निंदनीय आहे. हे यंत्रणेचे अपयश आहे. त्यामुळे या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता बिलाल खान यांनी केली.