मुंबई -कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबई, महाराष्ट्राचा विचार केला तर बरे होण्याचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्याचवेळी आता काहीशी चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे.
चीनमधील एका अभ्यासानुसार कोरोनातून बरे झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये श्वसनाचा विकार बळावत असून फुफ्फुसावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तर त्यांना बरेच दिवस ऑक्सिजनवर रहावे लागत आहे. मुंबईकरांसाठीही ही चिंतेची बाब आहे. कारण केईएम रुग्णालयात असे 22 रुग्ण आढळले आहेत. तर या आजाराला ‘पोस्ट इन्फेक्शन फायब्रोसिस’ असे संबोधले जात असल्याची माहिती आहे.
चीनच्या वुुहानमध्ये 35 ते 55 वयोगटातील 100 जणांचा एक सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार त्यांची एक चालण्याचीही चाचणी करण्यात आली. या वयातील सर्वसामान्य व्यक्ती 6 मिनिटात 600 मीटर ते 1000 मीटर चालतात. पण, यातील 100 पैकी 90 टक्के रुग्ण 400 मीटरमध्येच थकल्याचे आणि त्यांना श्वसनाचा विकार असल्याचे सिद्ध झाले. यासंबंधीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.
कोरोनामध्ये व्हायरल न्यूमोनिया होतो. यावर उपचार होतात, पण औषधामुळे न्यूमोनिया पूर्ण बरा होतोच असे नाही. तर अनेक रुग्णांमध्ये न्यूमोनिया बरा होण्यास मोठा कालावधी लागतो. अशात कोरोना संसर्गामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या तर श्वसनाचे विकार बळावतात. कारण, शरीरात घेतलेला प्राणवायू अर्थात ऑक्सिजन फुफ्फुसातून रक्तात जाण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी ऑक्सिजन कमी होतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो. तर अनेकांच्या फुफ्फुसावर संसर्गाचा मोठा परिमाण होऊन फुफ्फुसाला जखम होते. त्यामुळे कोरोनातून बरे झालेले अनेक रुग्ण या आजारासाठी पुन्हा रुग्णालयात येऊ लागल्याचेही भोंडवे यांनी सांगितले.
केईएम रुग्णालयात असे 22 रुग्ण मागील दोन महिन्यात आढळल्याची माहिती समोर आली आहे. याविषयी केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांना विचारले असता त्यांनी याला दुजोरा दिला आहे. केईएममध्ये कोरोना निगेटिव्ह रुग्ण श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने दाखल झाले आहेत. यातील 10 रुग्ण बरे झाले आहेत. तर 12 रुग्ण उपचार घेत आहेत.
दरम्यान, या रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत आहे. इतकेच नव्हे तर बरे होऊन घरी गेल्यानंतर ही ऑक्सिजन लावण्याची गरज पडत आहे. मुळात जे रुग्ण कोरोनाचा आजार अंगावर काढतात आणि आजार बळावल्यानंतर म्हणजेच फुफ्फुसातील संसर्ग वाढल्यानंतर येत आहेत. त्यामुळे कोरोना बरा होतो. पण फुफ्फुसातील जखम वा न्यूमोनिया बरा व्हायला बराच वेळ लागतो. तेव्हा रुग्णांनी कोरोनाची लक्षणे दिसल्याबरोबर डॉक्टरांकडे जावे, असे आवाहन यानिमित्ताने डॉ. भोंडवे यांनी केले आहे.