मुंबई - कोरोना महामारीमुळे काम आणि रोजगार गेल्यामुळे अनेक लोक संकटात असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक जणांना बेरोजगारीच्या महामारीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये कित्येक लोक एकमेकांना मदत करताना दिसून येत आहेत. मात्र, या परिस्थितीचा फायदा घेत भांडुपमधील एका सावकाराने कर्ज घेतलेल्या गृहस्थाला जीवे मारण्याची धमकी देत त्यांचे घर ताब्यात घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत त्रिलोक सिंह चड्ढा (७०) यांनी भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
भांडुप व्हिलेज रोडवर ९/९८ जैन इस्टेट येथे आपल्या कुटुंबासमवेत राहणाऱ्या त्रिलोक सिंह यांनी मुलीच्या लग्नासाठी भांडुप गावदेवी रोड येथील अजय गुप्ता नामक एका सावकाराकडून ४ लाख रुपये कर्ज घेतले होते. गुप्ता याने सिंह यांच्याशी हेवी डिपॉजिटचा करारनामा करत ६ महिन्यांसाठी त्यांचे राहते घर भाड्याने घेतले होते. त्यानंतर सिंह कुटुंबीय स्वतः इतरत्र भाड्याने राहू लागले. दरम्यान, कर्जाचे रीतसर मुद्दल आणि व्याज ते भरत असताना मध्येच लॉकडाऊन लागू झाले, आणि त्यांना कर्जाचे हफ्ते भरण्यास विलंब होऊ लागला.