महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना संकटात खासगी रुग्णालयाचा नवा धंदा... रुग्णाच्या उपचारासाठी नवनवीन पॅकेज - वनरुपी क्लिनिक मुंबई बातमी

मुंबई महानगरपालिकेच्या नव्या नियमानुसार, आता कोणतीही लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला होम क्वारंटाइन केले जाणार आहे. तर त्याला पालिकेच्या डॉक्टरांशी फोनवरून रोज संपर्कात राहत औषधपाणी घ्यावे लागणार आहे.

private-hospitals-announce-packages-for-corona-patient-in-mumbai
कोरोना संकटात खासगी रुग्णालयाचा नवा धंदा...

By

Published : Jun 9, 2020, 2:49 PM IST

मुंबई - कोरोनाची दहशत असताना खासगी रुग्णालयांनी मात्र यातही संधी शोधली आहे. होम क्वारंटाइन पॉझिटिव्ह रुग्णांला उपचार देण्याच्या नावाखाली नवा धंदा सुरू केला आहे. अशा रुग्णांना 350 रुपये ते 17 हजार रुपये प्रतिदिन खर्च आकारून त्यांची लूट करण्याची नवीन शक्कल शोधून काढली आहे. यात लहान रुग्णालयांपासून बड्या रुग्णालयांचाही समावेश आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या नव्या नियमानुसार, आता कोणतीही लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला होम क्वारंटाइन केले जाणार आहे. तर त्याला पालिकेच्या डॉक्टरांशी फोनवरून रोज संपर्कात राहत औषधपाणी घ्यावे लागणार आहे. मात्र, कोरोना पॉझिटिव्ह म्हटल्यास रुग्णाला भीती असणारच. त्यात आपल्याला योग्य उपचार मिळावेत हेही मनात असणार. मग त्यासाठी ते खासगी डॉक्टरांचा पर्याय निवडणार. हीच संधी हेरत खासगी रुग्णालयांनी होम क्वारंटाइन रुग्णांसाठी पॅकेज जाहीर केले आहेत. वरळी कोळीवाडा आणि बीडीडी चाळीत डोअर टू डोअर स्क्रीनिंग मोहीम राबवत येथील रुग्णसंख्या कमी करण्यास मदत करणाऱ्या, त्यासाठी कोणताही मोबदला न घेणाऱ्या वनरुपी क्लिनिकनेही आता अशा रुग्णांसाठी पॅकेज जाहीर केले आहे.

वनरुपी क्लिनिकचे पॅकेज...
वनरुपीच्या पॅकेजअंतर्गत मुंबईच्या कुठल्याही परिसरात रुग्ण असला तरी रोज 14 दिवस डॉक्टर त्याच्या घरी जाऊन त्याची तपासणी करणार आहेत. तसेच त्याची नियमित रक्त चाचणी आणि दोन कोरोना चाचण्याही करण्यात येणार असल्याची माहिती वनरुपी क्लिनिकचे सर्वेसर्वा डॉ. राहुल घुले यांनी सांगितले आहे. या संपूर्ण पॅकेजसाठी रुग्णाला 25 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजे दिवसाला 1 हजार 700 रुपये. डॉ. घुले यांनी मात्र यात कुठेही जादा पैसे आकारले जात नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पीपीई किटचे 500 रु, 500 रुपये डॉक्टर फी, 3 ते 4 हजार रुपयांच्या कोरोनाच्या दोन चाचण्या आम्ही करून देत आहोत. त्यामुळे हा खर्च रुग्णालयात दाखल होऊन जे उपचार घेतो, त्यापेक्षा कमी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लवकरच या सेवेला सुरुवात होईल, असेही घुले यांनी सांगितले.

रिलायन्स फाऊंडेशनची तीन पॅकेजेस...
रिलायन्स फाऊंडेशननेही होम क्वारंटाइन पॉझिटिव्ह रुग्णांसाठी 3 पॅकेज दिले आहेत. त्यांच्या हेल्पलाइन क्रमांकावर नोंदणी करत हे पॅकेज घेता येणार आहे. 375 रुपये दिवसाला रेग्युलर केअरपासून 500 रुपये आणि 750 रुपये प्रति दिन असे दोन पॅकेज त्यांनी दिले आहेत. ईटीव्ही भारतने त्यांच्या 9324947776 या क्रमांकावर संपर्क साधला असता, मुंबईतील रुग्णांना व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सल्ला देत त्यांना उपचार दिले जाणार असल्याचे सांगितले. मात्र, याहून अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. याशिवाय, टाटा हेल्थ आणि अन्य रुग्णालयाकडूनही असे पॅकेज देण्यात आले आहे.

पालिकेच्या मार्गदर्शकतत्वांचा अवलंब करावा...
या पॅकेजला कसा प्रतिसाद मिळतो हे येणाऱ्या दिवसांत कळेल. पण पॉझिटिव्ह रुग्णांनी अशा गोष्टींना न भुलता पालिकेच्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करावा, असे पालिकेकडून सांगितले जात आहे. 1916 या पालिकेच्या हेल्पलाईन नंबरवर अशा रुग्णांना सर्व माहिती, जी माहिती खासगी रुग्णालयात पैसे आकारत पॅकेजच्या नावाखाली दिली जात आहे, ती मोफत दिली जात आहे. पालिकेचे डॉक्टर रोज रुग्णांशी फोनवरून संपर्कात राहत आहेत. त्यामुळे या पॅकेजपासून रुग्णांनी दूर राहणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details