मुंबई -आज मध्य रेल्वेच्या सॅण्डहर्स्ट रोड स्थानकावर बनावट ओळखपत्र घेऊन फिरणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. मुनिष डांवरुग असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
असा झाला भांडाफोड-
भांडुप येथे राहणारा मुनिष डांवरूग बनावट रेल्वेचे ओळखपत्र घेऊन सोमवारी रेल्वे प्रवास करत होता. मध्य रेल्वे मार्गावरील सॅण्डहर्स्ट रोड स्थानकावर उतरला असता, त्याला तिकीट तपासनीस राजू गुर्जर यांनी पकडलं. मुनिष याच्याकडे तिकिटाची मागणी केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर गुर्जर यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा एफ.आर.सी पास मागितला. मात्र, मुनिषकडे तो पास नव्हता.
रेल्वेचे ओळखपत्र मागितल्यास त्यावर अयोग्य कर्मचारी क्रमांक होता. तसेच चुकीच्या ठिकाणी फोटो लावण्यात आला होता. यासह ओळखपत्रावरील रेल्वे प्रशासनाचा वॉटरमार्क नव्हता. त्यामुळे मुनिष बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करतो, याची खात्री पटली. त्यानंतर त्याला अधिक चौकशीसाठी पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
रेल्वे प्रशासनाची फसवणूक-
मुनिष डांवरूग याने रेल्वे प्रशासनाची फसवणूक करून विनातिकीट प्रवास करताना मिळून आला. मुलुंड येथील त्याचा सोबती सुमित काळे याने दिलेले रेल्वेचे बनावट ओळखपत्र घेऊन तो फिरत होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार तिकीट तपासनीस राजू गुर्जर यांनी केली आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे.
हेही वाचा -कोणत्याही चौकशीला सामोरे जाऊ, अनिल परब यांचे स्पष्टीकरण
हेही वाचा -मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ३६ दिवसात ४२९ दिवसांनी घसरला