मुंबई - 'बेटी बचाव, बेटी पढाओ'चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौदा दिवसात हाथरस येथील एका मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचार आणि त्यानंतरच्या तिच्या मृत्यूसंदर्भात एकदाही तिच्या कुटुंबीयांचे सांत्वन का केले नाही, असा सवाल माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. हाथरस येथील पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी हे जात असताना त्यांना उत्तर प्रदेश सीमेवरच उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवले इतकेच नव्हे तर राहुल गांधी यांच्यासोबत धक्काबुक्की करण्यात आल्याने त्या विरोधात देशभरात पडसाद उमटले.
'बेटी बचाव'चा नारा देणाऱ्या मोदींना 14 दिवसात हाथरसच्या मुलीची सांत्वना का करता आली नाही?' - पृथ्वीराज चव्हाण बातमी
उत्तर प्रदेशातील सरकारवर केंद्र सरकारचे कुठलेही नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार ताबडतोब बरखास्त करावे, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली.
दरम्यान, मंत्रालयाशेजारी असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत आंदोलन छेडले होते. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ज्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आणि तिचा मृत्यू झाला. त्या 14 दिवसाच्या काळामध्ये पंतप्रधान मोदींना या कुटुंबीयांची साधी सांत्वनाही का करता आली नाही, असा सवाल त्यांनी केला, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा या कुटुंबीयांना का भेटायला का गेले नाहीत, असाही सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर जोरदार टीका केली.
सामूहिक अत्याचारानंतर ज्या मुलीचा मृत्यू झाला त्या मुलीच्या मृत्यूनंतर तिचे प्रेत घाई घाई मध्ये जाळण्यात आले तिच्या कुटुंबीयांना सुद्धा अंत्यसंस्कार करू दिले नाहीत. त्यामुळे एकूणच सर्व पुरावे ते जाळून टाकण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश पोलिसांनी केला. या सर्व घटना निंदनीय आणि निषेधार्ह आहेत, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. उत्तर प्रदेशातील एकूणच या सर्व घटना लक्षात घेता येथे कायदा व्यवस्था शिल्लक राहिलेले नाही आणि या उत्तर प्रदेशातील सरकारवर केंद्र सरकारचे कुठलेही नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार ताबडतोब बरखास्त करावे, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली.