कैद्यांच्या मुलांकरिता तुरुंगातच अंगणवाडी मुंबई: तुरुंगातील बालकांनाही सुरक्षित आणि सर्वसाधारण आयुष्य मिळायला हवे तो त्यांचा हक्क आहे. या जाणिवेतून या तुरुंगामध्ये अंगणवाडी सुरू करण्याचा विचार तुरुंग महानिरीक्षक योगेश देसाई यांनी व्यक्त केला. या विचारांवर काम करीत भायखळा तुरुंगाच्या अधीक्षिका कीर्ती चिंतामणी यांनी तुरुंगाच्या आवारात अशी अंगणवाडी सुरू करण्याचा निर्धार केला.
मुंबईतील भायखळा हे पुरुष आणि महिला कायद्यांसाठी असलेले तुरुंग आहे. या तुरुंगात सध्या 305 महिला कैदी आणि 405 पुरुष कैदी आहेत. तर दहा लहान बालक महिला कैदी यांच्यासोबत तुरुंगाच्या आवारात आहेत. वास्तविक तुरुंग म्हणजे नकारात्मकता आणि गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या अनेक व्यक्तींच्या एकत्र असलेला वावर असतो. अशा वातावरणात महिला बंदी यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या लहान मुलांवर नेहमी नकारात्मक परिणाम होत असतो. या मुलांना सर्वसाधारण आयुष्याची कल्पना येत नाही. त्यामुळे त्यांची मानसिक आणि बौद्धिक वाढही खुंटते. तसेच त्यांच्या शारीरिक हालचालींवरही मर्यादा येतात.
सर्वांगीण वाढ व्हावी याकरिता अंगणवाडीची सुरुवात-मुलांचा सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडीय संदर्भात बोलताना कीर्ती चिंतामणी म्हणाल्या की, या ठिकाणी आलेल्या कैदी महिलांसोबत असलेली त्यांची मुले ही नेहमीच अयोग्य वातावरणात वाढत असतात. त्यांच्या मुलांना सर्वसामान्य आयुष्य जगता यावे त्यांच्याप्रमाणे शिक्षण आणि त्यांची सर्वांगीण वाढ व्हावी यासाठी अशा पद्धतीच्या अंगणवाडीची गरज होती, असे भायखळा तुरुंग अधीक्षिका कीर्ती चिंतामणी यांनी सांगितले.
आम्ही अंगण या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने आणि महिला बाल विकास विभागाच्या पुढाकाराने तुरुंगाच्या आवारातच नन्हे कदम ही अंगणवाडी सुरू केली- भायखळा तुरुंग अधीक्षिका कीर्ती चिंतामणी
तुरुंग कर्मचाऱ्यांबरोबर शिकतात कैद्यांचे मुले-तुरुंगातील महिलांच्या मुलांसाठी अंगणवाडी सुरू करताना केवळ या मुलांसाठी अंगणवाडी सुरू केली तर त्यांच्या दैनंदिन व्यवहारात फारसा फरक पडणार नाही याची आम्हाला जाणीव झाली. कारण बाहेरील जगामध्ये नेमके काय व्यवहार आहे कशा पद्धतीने वर्तणूक केली जाते, याची त्यांना माहिती होणे आवश्यक आहे, असल्याचे तुरुंग अधिकारी अमृता यशवंत यांनी सांगितले.
सर्वसामान्य मुलांमध्ये मिसळायची संधी दिली पाहिजे म्हणून आम्ही आमच्या तुरुंग कर्मचाऱ्यांच्या मुलांसोबतच कैद्यांच्या मुलांना एकाच अंगणवाडीत शिकवण्याचा निर्णय घेतला- तुरुंग अधिकारी अमृता यशवंत
राज्यात अन्य ठिकाणी तुरुंगात अंगणवाड्या सुरू करणार- मुंबईतील तुरुंगातील अंगणवाडीप्रमाणे राज्यातील अन्य तुरुंगांमध्ये पुणे, नागपूर, कोल्हापूर व औरंगाबाद या ठिकाणीसुद्धा तुरुंगामध्ये अंगणवाड्या सुरू करण्याचा आमचा विचार आहे. अंगणवाड्यांमध्ये आल्यानंतर तुरुंगातील बालकांना शिक्षण आणि संस्कार हवे असतात. त्यामुळे बालक सुजाण नागरिक म्हणून ते घडतील यासाठी आमच्यावतीने आम्ही हा प्रयत्न करणार आहोत असे अंगणच्या कामना चौधरी यांनी सांगितले.
मुलांच्या चेहऱ्यावर आनंद-भायखळा तुरुंगामधील या नव्या अतिशय सुंदर अशा अंगणवाडीमध्ये मुलांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांना खेळ, शिक्षणाचे साहित्य आणि भिंती रंगवण्यात आल्या आहेत. अतिशय चांगल्या वातावरणात मुलांना बाराखडी, गाणी, अंक ज्ञान आणि अक्षर ओळख करून दिली जात आहे. मुलांना खाऊही दिला जात असून यामुळे सर्वच मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
हेही वाचा-
- Rare Trees in India : दहीपळस झाड नव्हे तुमचा आहे डॉक्टर... विषाचा प्रभाव कमी करण्यापासून दारूचे व्यसन सोडविणारे 'असे' आहेत फायदे
- Godhadi Business : गोधडी शिवण्याच्या व्यवसायातून 200 महिलांना रोजगार, पारंपारिक कला जगभरात नेण्याचा एनजीओंचा प्रयत्न
- Maharashtra politics: 'वंचित' महाविकास आघाडीत सामील होणार का? जाणून घ्या राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांच्या प्रतिक्रिया