मुंबई - मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने चार महिन्याच्या प्रिन्सचा हात व कान जळाला. प्रिन्सवर शस्त्रक्रिया करून त्याचा हात आणि कान कापण्यात आला आहे. हा अपघात रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याने कुटुंबीयांना १० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, दोषी अधिकारी, डॉक्टर व डीनवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांनी पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत केली.
केईएम रुग्णालयाच्या चुकीमुळे प्रिन्सचा हात अन् कान कापला हेही वाचा-कोश्यारी पहिलेच नाहीत.. यापूर्वीही राज्यपालांचे अनेक निर्णय ठरले वादग्रस्त
आठवडाभरापूर्वी केईएम रुग्णालयात एसीजीवर उपचार घेत असताना मशिनमध्ये बिघाड होऊन चार महिन्याच्या चिमुकल्या प्रिन्सचा हात भाजला. त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करून हात काढून टाकावा लागला आहे. या दुर्घटनेबाबत रुग्णालयाच्या हलगर्जीपणा विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिष्ठाताकडून चौकशी केली जाणार आहे. मात्र, संबंधित डीनवरच निलंबनाची कारवाई करून चौकशी करावी. तसेच प्रिन्सच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व उपचाराचा संपूर्ण खर्च तातडीने द्यावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. या दुर्घटनेबाबतचा मुद्दा भाजपच्या नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी स्थायी समितीत उपस्थित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले.
मालाड येथे भिंत कोसळली त्याविभागात शिवसेनेचे आमदार असल्याने त्वरित पालिकेकडून ५ आणि राज्य सरकारकडून ५ असे एकूण दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. मात्र, प्रिन्सचा एक हात आणि कान कापला तरी पालिकेने त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई दिलेली नाही. पालिकेने नुकसान भरपाई देण्यासाठी धोरण बनवावे, अशी मागणी गटनेत्यांच्या बैठकीत केली होती. मात्र, त्यावर अद्याप प्रशासनाकडून निर्णय झालेला नाही. यामुळे मालाड दुर्घटनेप्रमाणे प्रिन्सला दहा लाखांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली. यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी रुग्णालयाच्या हलगर्जीपणाबाबत संताप व्यक्त करीत कारवाईची मागणी केली. याची चौकशी सुरु असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान काय कारवाई केली याबाबतचा अहवाल येत्या बैठकीत सादर करावा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.
नेमके काय घडले?
उत्तर प्रदेशातील महू जिल्ह्यातून चार महिन्यांच्या प्रिन्सला घेऊन त्याचे वडील उपचारासाठी मुंबईत आले होते. त्याच्या हृदयात असणाऱ्या छिद्रावर उपचार करण्यासाठी त्यांनी केईएम रुग्णालयात दाखल केले. त्याचा ईसीजी केला जात असताना शॉर्टसर्किट झाले. प्रिन्स ज्या गादीवर झोपला होता त्या गादीला आग लागली. त्यात प्रिन्सचा एक हात आणि कान भाजला. हाताला व कानाला संसर्ग होऊन रक्ताभिसरणाला अडथळे निर्माण होऊ लागल्यामुळे सोमवारी शस्त्रक्रिया करुन हात आणि कान कापण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे प्रिन्सला आपले संपूर्ण आयुष्य दिव्यांगांप्रमाणे जगावे लागणार आहे.