मुंबई - महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे लागलेल्या आगीत दोन महिन्यांच्या प्रिन्सचा हात कापावा लागला. त्याला निमोनिया झाला होता. त्याच्या रक्तदाबामध्ये सतत चढउतार होत होता. गेले काही दिवस प्रिन्स मृत्यूशी झुंज देत होता. रात्री त्याला हृदयविकाराचा झटका आला, त्यात मध्यरात्री २.४५ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.
केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीने प्रिन्सचा अखेर मृत्यू, आधी गमावला होता हात - डॉ. हेमंत देशमुख बातमी
उत्तर प्रदेशमधील मवूय येथील प्रिन्स या दोन ते अडीच महिन्याच्या बालकाच्या हृदयात छिद्र असल्याने त्यावर उपचारासाठी पालिकेच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्यात प्रिन्स २० ते २२ टक्के भाजला होता.
हेही वाचा-केवळ १ रुपया प्रतिएकर दराने १५ एकर जमीन बळकावली; पतंजलीला उच्च न्यायालयाची नोटीस
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात चांगले उपचार मिळतात म्हणून देशभरातून रुग्ण पालिका रुग्णालयात येत असतात. उत्तर प्रदेशमधील मवूय येथील प्रिन्स या दोन ते अडीच महिन्याच्या बालकाच्या हृदयात छिद्र असल्याने त्यावर उपचारासाठी पालिकेच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्यात प्रिन्स २० ते २२ टक्के भाजला. त्याचा हात, कान, आणि छातीचा भाग भाजला. गॅंगरिंग झाल्याने त्याचा हात कापण्यात आला. याचे पडसाद स्थायी समिती, सभागृहात उमटले. प्रिन्सच्या उपचाराचा सर्व खर्च पालिकेने उचलावा, नुकसान भरपाई म्हणून १० लाख रुपये द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. पालिकेने प्रिन्सच्या कुटुंबीयांना ५ लाख देण्याची तयारी दाखवली. हे ५ लाख रुपये प्रिन्सच्या कुटुबीयांनी घेण्यास नकार दिला. त्यानंतर काल बुधवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, प्रिन्सची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. त्याच्या रक्तदाबामध्ये सतत चढउतार जाणवत होता. त्याला पूर्णपणे कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. त्याच्या या एकंदरीत परिस्थितीबाबत पालकांना माहिती देण्यात आली होती. प्रिन्सला न्यूमोनिया झाला होता. त्याच्या फुफ्फुसामध्ये आणि पोटातील संसर्गामध्येही वाढ झाली होती. प्रिन्स उपचारांना देखील योग्यरित्या प्रतिसाद देत नाही, अशी माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाकडून काल देण्यात आली होती. मध्यरात्री २.३० च्या सुमारास प्रिन्सला हृदयविकाराचा झटका आला. त्यावर उपचार करण्यात आले. मात्र, २.४५ वाजता त्याचा मृत्यू झाल्याचे केईएम रुग्णालयाचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांनी कळविले आहे.