मुंबई - Prime Minister remembered Latadidi : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा मोठ्या थाटामाटात होणार आहे. यासाठी देशभर भक्तीमय वातावरण निर्माण करण्यात आलं असून या भक्तीमय वातावरणातच दिवंगत गान कोकिळा लता मंगेशकर यांची पंतप्रधान मोदी यांना उणीव भासत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत लतादीदींनी गायलेलं शेवटचं भजन शेअर करत त्यांचे स्मरण केले.
लता दीदींनी गायलेलं शेवटचं भजन- देशातील कोट्यावधी रामभक्त आतुरतेने ज्या २२ जानेवारी या दिवसाची वाट बघत आहेत तो दिवस आता जवळ आला आहे. या दिवशी अयोध्येमध्ये राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार असून या सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या दिवशी देशातील प्रत्येक घरात श्रीरामाचा जयघोष व्हावा, सर्व ठिकाणी दीप प्रज्वलित करून दीपावली साजरी करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मोठ्या थाटामाटात व भक्तिमय वातावरणात श्रीरामाचं स्वागत केलं जाणार असल्याने अशाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची गानकोकिळा लता मंगेशकर यांची आठवण काढली असून त्यांनी गायलेलं शेवटचं भजन एक्सवर पोस्ट करत शेअर केलं आहे.
राम रक्षा रेकॉर्ड करायचं सुद्धा राहून गेलं- लतादीदींनी गायलेला श्लोकचा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर शेअर केला आहे. लतादीदींनी रेकॉर्ड केलेला 'श्री रामार्पण' हा त्यांचा शेवटचा श्लोक होता, असं त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आल्याचंही पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. श्री रामार्पण हा राम रक्षेतील श्लोक असून लता मंगेशकर यांची पूर्ण राम रक्षा रेकॉर्ड करायची इच्छा सुद्धा राहून गेली. लतादीदींनी श्री रामार्पण इतक्या उत्कंठेने व मंत्र स्वरात गायले आहे की, सर्वजण मंत्रमुग्ध होतात.
अयोध्येत तयारी जोमात - २२ जानेवारीला अयोध्येत राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठीची तयारी फार जोमात सुरू असून संपूर्ण देशाचे लक्ष याप्रसंगी होणाऱ्या विविध कार्यक्रमांवर लागलं आहे. यासाठी संपूर्ण देशात उत्सवाचं वातावरण असून अनेक देशातील अनेक मान्यवर, सेलिब्रिटी यांनाही याचं आमंत्रण देण्यात आलं आहे.
हेही वाचा -
- 'हनुमान'नं रिलीजच्या पाचव्या दिवशी कमाईत 'गुंटूर कारम'ला टाकले मागे
- विद्या बालन आणि इलियाना डिक्रूझ स्टारर 'दो और दो प्यार'चं फर्स्ट लूक रिलीज
- रिचा चड्ढाने घेतला फ्लाइट विलंबाचा कटू अनुभव, एअरलाइन्समधील मक्तेदारीला दिला दोष