मुंबई :भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज दादर येथील वसंत स्मृती सभागृहात पार पडली. या बैठकीला सकाळच्या पहिल्या सत्रात भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी मार्गदर्शन केले. आमदार अतुल भातखळकर यांनी राजकीय प्रस्ताव मांडला. त्याला आमदार अमीत साटम यांनी अनुमोदन दिले. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीला खासदार गोपाळ शेट्टी, पुनम महाजन, मनोज कोटक यांच्यासह सर्व आमदार आणि मुंबई पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचा समारोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाने झाला. याप्रसंगी बोलताना भाजपा मुंबई अध्यक्ष, आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सटकून टीका केली आहे.
अकेला सबको भारी पड रहा है :याप्रसंगी बोलताना मुंबई अध्यक्ष असे शेलार म्हणाले की, हिंदुस्तान देख रहा है एक अकेला सबको भारी पड रहा है. राज्यसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बाब अधोरेखित केली. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा एक मोदी सगळ्यांना भारी पडेल असा विश्वास व्यक्त करीत मुंबई भाजपा अध्यक्ष अॅड.आशिष शेलार यांनी भाजपा कार्यकर्त्यांना समजदारी, सहनशक्ती आणि सेवाकार्य वाढवा असे निर्देश दिले.
भाजपाशी गद्दारी ठाकरेंना महागात :शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी, काँग्रेस, वंचित, किंचित, माकपा, सपा हे सगळे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भितीने एकत्र आले. भाजपा सोबत होते तेव्हा सन्माननीय नेतृत्व शिवसेनेसोबत होतेअसे सांगत, भाजपाशी गद्दारी केल्यापासून ना त्यांच्याकडे नेतृत्व आहे, ना मतदार आहेत, ना आमदार आहेत. आज मतांसांठी दारोदारी कटोरा घेऊन फिरावे लागते आहे असेही शेलार म्हणाले.