मुंबई :मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथील मैदानावर झालेल्या विराट सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून सुरुवात करत मुंबईकरांना अभिवादन केले. तसेच, मुंबईच्या विकासासाठी ४० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण केल्याची घोषणा सुद्धा केली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारत मोठी स्वप्न पाहत आहे. गेला काही काळ केवळ गरीबीची चर्चा आणि जगाकडून मदत मागण्यातच गेली असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधला. आता भारताच्या मोठ्या संकल्पनांवर जगाला विश्वास होतो आहे, हेही पहिल्यांदाच घडत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी दाओस मधील सांगितलेला अनुभव हा अनुभव सगळीकडे येत असल्याचेही ते म्हणाले. भारत आपल्या सामर्थाचा खूप चांगल्या पद्धतीने सदुपयोग करीत असल्याचा जगाला विश्वास बसत असून पूर्वी गरीब कल्याणासाठी असलेले पैसे भ्रष्टाचारात गुंतले जायचे हे आम्ही पाहिले आहे, असेही ते म्हणाले आहेत.
विकसित भारताच्या उभारणीत शहरांची भूमिका अत्यंत महत्त्वाचीआता डबल इंजिन सरकारवर लोकांचा विश्वास आहे. व या सरकारमुळेच लोकांचा विकास होत असून लोकांना मूलभूत सुविधा अत्यंत वेगाने उपलब्ध होत आहेत. तसेच आधुनिक सोयीसुविधांची चर्चा होत होती ते आज लोकांना मिळत आहे. विकसित भारताच्या उभारणीत शहरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. महाराष्ट्रातील अनेक शहरे येत्या २५ वर्षात भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतील असेही मोदी म्हणाले. २०१४ पर्यंत मुंबईत फक्त दहा-अकरा किलोमीटर मेट्रो सुरु होती. शिंदे आणि देवेंद्र यांची जोडी आल्यावर पुन्हा एकदा जोरदार काम सुरू झाले असून मेट्रोच्या कामाने वेग घेतल्याचेही मोदी म्हणाले. ३०० किलोमीटरच्या मेट्रो मार्गाकडे आपण जलद गतीने जात आहोत. रेल्वेला आधुनिक बनवण्यावर मिशन मोडवर काम सुरू आहे. डबल इंजिन सरकार सर्वसामान्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. काही काळात विकास रखडला होता पण आता येणाऱ्या काही वर्षात मुंबईचा कायापालट होईल असेही मोदी म्हणाले.
भाजप आणि एनडीए कधीही विकासाला ब्रेक लावत नाही :पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, दुकानदारांपासून मोठ्या व्यावसायिकांपर्यंत मुंबईत राहणे सर्वांना सोयीचे होणार आहे.धारावी पुनर्विकास, जुन्या चाळींचा विकास सर्व आता ट्रॅक वर येत आहे.शिंदे आणि देवेंद्र यांना यासाठी शुभेच्छा देत मुंबईच्या विकासासाठी बजेटची कमी पडणार नाही असे आश्वासनसुद्धा मोदी यांनी दिले. परंतु तो पैसा योग्य ठिकाणी वापरला गेला पाहिजे हे सांगायला ते विसरले नाहीत. कारण महानगरपालिकेत इतकी वर्ष सत्ता असताना शिवसेनेच्या काळात जो भ्रष्टाचार झाला त्याची पोलखोल सध्या भाजपकडून केली जात आहे. त्यासाठी स्थानिक सत्ता महत्त्वाची असते. विकासाचे काम रोखण्याची प्रवृत्ती असेल तर मुंबईचे भविष्य कसे उज्वल होईल, असे सांगत त्यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेवर टोला लगावला.